वेलिंग्टन, दि. २५ - भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मालिकांसाठी न्यूझीलंडने नऊ जणांच्या कोअर टीमची घोषणा केली आहे. मात्र या नऊ जणांच्या संघात अष्टपैलू जिमी निशमला स्थान देण्यात आलेले नाही. निवडण्यात आलेल्या नऊ जणांच्या संघामध्ये कर्णधार केन विल्यम्सनसह ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी, ग्रँडहोम, मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, अॅडम मिल्ने, मिचेल सेंटनर, टीम साऊदी आणि रॉस टेलर यांचा समावेश आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या या मालिकेसाठी संघातील उर्वरित खेळाडूंची घोषणा न्यूझीलंडच्या अ संघाची भारत अ संघाविरुद्धची मालिका आटोपल्यानंतर केली जाईल. जिमी निशम आणि फलंदाज नील ब्रूम यांना इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करता आली नव्हती त्यामुळे त्यांना या संघातून डच्चू देण्यात आला आहे. "निवडण्यात आलेले नऊ खेळाडू हे आमच्या एकदिवसीय संघातील अव्वल खेळाडू असून, त्यांना भारतात खेळण्याचा चांगला अनुभव आहे," असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी सांगितले.
भारत आणि न्यूझीलंडचे अ संघ सध्या भारतात मालिका खेळत असून, १५ ऑक्टोबर रोजी ही मालिका आटोपणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेची सुरुवात सराव सामन्याने होईल. पहिला सराव सामना १७ ऑक्टोबरला तर दुसरा सराव सामना १९ ऑक्टोबरला मुंबई येथील सीसीआयच्या मैदानावर होईल. या मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला २२ ऑक्टोबरपासून मुंबईतून सुरुवात होईल. यानंतर पुणे (२५ ऑक्टोबर) आणि उत्तर प्रदेश क्रिकेट संघ (२९ ऑक्टोबर) येथे पुढील दोन सामने होतील. या सामन्याचे स्थळ अद्याप ठरलेले नाही. तसेच, न्यूझीलंडविरुद्धची ३ सामन्यांची टी२० मालिका 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यात नवी दिल्ली (१ नोव्हेंबर), राजकोट (४ नोव्हेंबर) आणि तिरुवअनंतपुरम (७ नोव्हेंबर) येथे तीन ट्वेंटी-२० सामने खेळवले जातील.
न्यूझीलंडच्या संघाने गतवर्षी भारताचा दौरा केला होता. त्यावेळी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला ३-० ने तर ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने पराभव पत्करावा लागला होता.
न्यूझीलंडचा कोअर संघ - केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी, ग्रँडहोम, मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, अॅडम मिल्ने, मिचेल सेंटनर, टीम साऊदी, रॉस टेलर.
Web Title: New Zealand announced the core team's announcement of the nine tournaments for India tour, excluding Neesmala
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.