nz vs ned live match : वन डे विश्वचषकात आज न्यूझीलंड आणि नेदरलॅंड्स आमनेसामने आहेत. नेदरलॅंड्सचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे, तर न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात गतिवजेच्या इंग्लिश संघाला पराभूत करून विजयी सलामी दिली. आज नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने सांघिक खेळी करत मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर डेव्हिन कॉन्वे आणि विल यंग यांनी चांगली सुरूवात केली.
न्यूझीलंडच्या सर्वच फलंदाजांनी आज हात साफ करून घेतल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या व्यासपीठावर खेळण्याचा अनुभव नसलेल्या नेदरलॅंड्समोर किवी संघाने धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३२२ धावा केल्या. त्यामुळे विजयाचे खाते उघडण्यासाठी नेदरलॅंड्समोर ३२३ धावांचे तगडे लक्ष्य आहे.
न्यूझीलंडकडून विल यंगला सर्वाधिक (७०) धावा करण्यात यश आले. तर, डेव्हिन कॉन्वे (३२), रचिन रवींद्र (५१), डेरिल मिशेल (४८) आणि टॉम लॅथमने (५३) धावा केल्या. किवी संघाच्या फलंदाजांनी नेदरलॅंड्सच्या सर्वच गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. अखेरच्या काही षटकांमध्ये अष्टपैलू मिचेल सॅंटनरने स्फोटक खेळी करताना २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १७ चेंडूत ३६ धावांची नाबाद खेळी केली. नवख्या नेदरलॅंड्सच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत बलाढ्य न्यूझीलंडला ३२२ धावांपर्यंत कसेबसे रोखले. आर्यन दत्त, रयान क्लेन आणि रिलोफ वान डर मर्व यांना प्रत्येकी २-२ बळी घेता आले. तर पाकिस्तानविरूद्धचा सामना गाजवणारा बेस डी लीडेला एक बळी घेण्यात यश आले. नेदरलॅंड्सचा संघ पाकिस्तानकडून पराभूत होऊन इथपर्यंत पोहचला आहे, तर न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून २०१९ च्या विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला.