ड्यूनेडिन : मार्टिन गुप्तिलच्या ५० चेंडूतील ९७ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा धक्का दिला. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमानांनी चार धावांनी सरशी साधली.
नाणेफेक गमविणाऱ्या न्यूझीलंडला फलंदाजीचे आमंत्रण मिळताच ७ बाद २१९ धावा उभारल्या. ऑस्ट्रेलियाने १३२ षटकात ११३ धावात सहा फलंदाज गमावले होते. मार्कस् स्टोयनिसने त्यानंतर ३७ चेंडूत ७८ धावा ठोकून संघाला विजयाच्या दारात आणले होते. त्याने डॅनियल सॅम्ससोबत ६.१ षटकांत ९२ धावांची भागीदारी केली. सॅम्सने १५ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात १५ धावांची गरज होती. त्यांचे चार गडी शिल्लक होते. न्यूझीलंडने अखेरचे षटक निशामला दिले. हा निर्णय योग्य ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर सॅम्सला बाद केले. स्टोयनिस पुढच्या दोन्ही चेंडूवर धावा काढण्यात अपयशी ठरला. पण चौथ्या चेंडूवर त्याने षटकार खेचताच अखेरच्या दोन चेंडूवर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९ धावा हव्या होत्या. स्टोयनिसने उत्तुंग फटका मारण्याच्या नादात टिम साऊदीकडे झेल दिला. ऑस्ट्रेलिया संघ ८ गड्यांच्या मोदबल्यात २१५ धावांपर्यंतच पोहोचू शकला. या विजयामुळे न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड : २० षटकांत ७ बाद २१९ (मार्टिन गुप्तिल ९७, केन रिचर्डसन ५३, जिम्मी निशाम ४५; गोलंदाजी : केन रिचर्डसन ३/४३) ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ८ बाद २१५ (वेड २४, फिंच १२, जोस फिलिप ४५, मार्क्स स्टोयनिस ७८, डॅनियल सॅम्स ४१; गोलंदाजी : सेंटेनर ४/३१, निशाम २/१०)