Join us  

NZ vs IRE: उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान न्यूझीलंडला; भारताच्या Final च्या मार्गात ठरणार अडथळा?

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 1:17 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून उपांत्य फेरीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आज न्यूझीलंडनेआयर्लंडचा पराभव करून अ गटातून उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले आहे. न्यूझीलंडने 35 धावांनी आयर्लंडचा पराभव केला आणि 7 गुणांसह उपांत्य फेरी गाठली. केन विलियमसनने केलेल्या 35 चेंडूत 61 धावांच्या ताबडतोब खेळीच्या जोरावर किवी संघाने मोठा विजय मिळवला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून 20 षटकांत 6 बाद 185 धावांचा डोंगर उभारला होता. 

तत्पुर्वी, आयर्लंडने नाणेफेक जिंकून किवी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. किवी संघाने शानदार सुरूवात केली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या बळीसाठी अर्धशतकी भागीदारी नोंदवली. मात्र फिन लेन 32 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडला पहिला झटका बसला. त्याच्या पाठोपाठ डेव्होन कॉनवे देखील (28) धावा करून तंबूत परतला. मात्र कर्णधार केन विलियमसनने किवीच्या फलंदाजीची धुरा सांभाळली. त्याने ताबडतोब खेळी करताना 35 चेंडूत 61 धावा चोपल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये डेरी मिचेलने 31 धावांची साजेशी खेळी करून आयर्लंडला तगडे आव्हान दिले. आयर्लंडकडून जोशुआ लिटलने हॅटट्रिक घेऊन सर्वाधिक 3 बळी पटकावले. गॅरेथ डेलनीने 2 बळी घेतले तर मार्क अडायरला 1 बळी घेण्यात यश आले. 

उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान न्यूझीलंडलान्यूझीलंडने दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडची शानदार सुरूवात झाली होती. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबर्नी यांनी 68 धावांची भागीदारी नोंदवली. मात्र ईश सोधी आणि मिचेल सॅंटनर यांनी आयर्लंडच्या आशेवर पाणी टाकले आणि दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवले. त्यानंतर कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करण्यात यश आले नाही. किवी संघाकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर टिम साऊदी, मिचेल सॅंटनर आणि ईश सोधी यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले. अखेर आयर्लंडचा संघ 20 षटकांत 9 बाद केवळ 150 धावा करू शकला आणि न्यूझीलंडने 35 धावांनी मोठा विजय मिळवला. 

भारताच्या Final च्या मार्गात ठरणार अडथळा?अ गटातून न्यूझीलंडचा संघ 7 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यामुळे अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी चुरस होईल अशी अपेक्षा होती. मात्र अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. खरं तर ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी सामना जिंकला मात्र अफगाणिस्तानने कडवे आव्हान देऊन संघाच्या यजमान संघाच्या अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे उद्या होणारा इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना निर्णायक असणार आहे. उद्याच्या सामन्यातील विजय इंग्लंडला विश्वचषकाचे तिकिट मिळवून देईल. मात्र इंग्लंडचा पराभव झाला तर ऑस्ट्रेलियाला संधी मिळू शकते कारण इंग्लंडचे आताच्या घडीला 5 गुण आहेत तर ऑस्ट्रेलियाचे 7 गुण आहेत.  तर ब गटातून भारतीय संघ 6 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारत उपांत्य फेरी गाठणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मात्र भारत ब गटातून दुसऱ्या स्थानावर राहिला तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना न्यूझीलंडविरूद्ध होईल. याशिवाय भारत जर अव्वल स्थानावरच राहिला तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासोबत होऊ शकतो. 

 2015 पासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा प्रवास 

  • - 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे उपविजेते.
  • - 2016 टी-20 विश्वचषकाचा उपांत्य फेरीपर्यंत पोहचले.
  • - 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते.
  • - 2021 टी-20 विश्वचषकाचे उपविजेते.
  • - 2022 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र. 

 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२न्यूझीलंडकेन विल्यमसनआयर्लंडभारतीय क्रिकेट संघ
Open in App