ऑकलंड : वेगवान गोलंदाज जॅकब डफीने न्यूझीलंडतर्फे पदार्पण करताना ३३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. डफीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर यजमान संघाने शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने पाकिस्तानची सुरुवातीला ५ बाद ३९ अशी अवस्था केली होती. त्यानंतर पाकिस्तानने ९ बाद १५३ धावांची मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ७ चेंडू राखून विजय साकारला. सलामीवीर फलंदाज टीम सेफर्टने (५७ धावा) आपले चौथे टी-२० अर्धशतक झळकावले. मार्क चॅपमॅनने ३४ धावांचे योगदान दिले तर मिशेल सँटनेर शेवटी १२ धावा काढून नाबाद राहिला.
ओटागो प्रांतच्या डफीने गोलंदाजी शैलीने स्विंग व उसळी मिळवताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या चौथ्या चेंडूवर बळी घेतला. त्यानंतर त्याने दुसऱ्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या चेंडूंवर दोन बळी घेतले, पण त्याला हॅटट्रिक नोंदवता आली नाही. १८ व्या षटकांत त्याने पाकिस्तानचा कर्णधार शादाब खान (४२ धावा) माघारी परतवत १३ धावांत चौथा बळी घेतला.
डफी व्यतिरिक्त न्यूझीलंडचे सहकारी गोलंदाज स्कॉट कुगेलेजिन व ब्लेयर टिकनर यांनी फुल लेंग्थ व उसळीने पाकच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दोन फलंदाजांना झटपट गमावले होते. त्यानंतर सेफर्ट व ग्लेन फिलिप्स (२३) यांनी डाव सावरला. सेफर्ट व मार्क चॅपमॅन (३४) यांनी त्यानंतर ५५ धावांची भागीदारी केली.
Web Title: New Zealand beat Pakistan by 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.