मुंबईतील वानखे़डेच्या मैदानात न्यूझीलंडनं दिलेल्या १४७ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. इतिहासात पहिल्यांदाच ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघावर व्हाइट वॉशची नामुष्की ओढावली आहे. रिषभ पंतच्या अर्धशतकी खेळीशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. तो आउट झाला आणि सामना न्यूझीलंडच्या बाजूनं फिरला.
एजाज पटेलनं पुन्हा गाजवलं वानखेडेचं मैदान, संघाच्या विजयात उचलला मोलाचा वाटा
एजाझ पटेल पुन्हा एकदा वानखेडेवर किंग ठरला. त्याने सर्वाधिक ६ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावातही त्याच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. परिणामी भारतीय संघाचा दुसरा डाव १२१ धावांतच आटोपला. याआधी वानखेडेच्या मैदानात एजाज पटेलनं एका डावात १० विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला होता. पुन्हा एकदा त्याने या मैदानात आपली छाप सोडली. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघानं २५ धावांनी सामना जिंकत टीम इंडियाला ३-० अशी मात दिली. भारतीय संघाला क्लीन स्वीप करण्याचा रेकॉर्ड न्यूझीलंडन आपल्या नावे केला आहे.
टीम इंडियावर ओढावली मायदेशात व्हाइट वॉशची नामुष्की
आतापर्यंतच्या कसोटी इतिहासात भारतीय संघानं मायदेशात एकूण ६५ कसोटी मालिकेत ३७ मालिका विजय मिळवले आहेत. यात ५ वेळा टीम इंडियानं पाहुण्या संघाला व्हाइट वॉश केल्याचे पाहायला मिळाले होते. पण यावेळी टीम इंडियालाच पाहुण्या संघानं व्हाइट वॉश दिला आहे. १२ वर्षांनतर घरच्या मैदानात मालिका गमावल्यानंतर टीम इंडियावर पहिल्यांदाच घरच्या मैदानात क्लीन स्वीपची नामुष्की ओढावली आहे.
भारतीय मैदानात जे कुणाला जमलं नाही ते न्यूझीलंडन करून दाखवलं
भारतीय दौऱ्यावर येण्याआधी न्यूझीलंडच्या संघाला श्रीलंकेच्या संघानं पराभवाचा दणका दिला होता. त्यामुळे टीम इंडियापुढे त्यांचा निभाव लागणं अवघड आहे, असे बोलले गेले. केन विलियम्सनच्या अनुपस्थिती भारतीय दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाने त्या चर्चा फोल ठरवल्या. बंगळुरुच्या मैदान मारत मालिकेत त्यांनी विजयी सलामी दिली. एवढ्यावरच न थांबता पुण्याच्या मैदानातील सामना जिंकत त्यांनी ३६ वर्षांनी भारतीय मैदानात पहिली वहिली मालिका जिंकत इतिहास रचला. त्यानंतर मुंबईच मैदान मारत त्यांनी भारतीय संघाला ३-० अशा फरकाने पराभूत करण्याचा पराक्रमही करून दाखववला.