नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, तिथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांचा समावेश आहे. 18 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. खरं तर भारताच्या टी-20 संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे खूप कौतुक केले आहे. याशिवाय उमरान मलिक एक अतिशय रोमांचक प्रतिभा असलेला खेळाडू असल्याचे विलियमसनने म्हटले. उमरान आयपीएलमध्ये विलियमसनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादसाठी खेळला आहे. या युवा वेगवान गोलंदाजाने 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. मात्र दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या जागी टी नटराजनची निवड झाली होती. लक्षणीय बाब म्हणजे 150 किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिकने कमी वेळातच प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे. आयपीएल 2022 मध्ये उमरान मलिकने हंगामातील सर्वात वेगवान 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकून विक्रम नोंदवला होता. तर न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने 157.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.
किवी संघाचा कर्णधार विलियमसनने उमरान मलिकचे कौतुक करताना म्हटले, "उमरान एक अतिशय रोमांचक प्रतिभा असलेला खेळाडू आहे. मागील वर्षी आयपीएलमध्ये त्याच्यासोबत वेळ घालवला आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग ही आमच्या संघाची खरी संपत्ती होती. आता त्याला आंतरराष्ट्रीय संघात पाहणे हे अभिमानास्पद आहे. मला वाटते की जर तुमच्याकडे 150 प्रति ताशी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता असेल तर ती चांगली प्रतिभा आहे."
उमरान मलिककडून खूप अपेक्षा - विलियमसन
"मला वाटते की आता तो संघात असल्याने भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ राहील. या दौऱ्यावर आल्यामुळे त्याला अधिकाधिक वेळ खेळण्याची संधी मिळाली आहे, ती नक्कीच त्याला त्याच्या आगामी प्रवासासाठी मदत करेल. पण होय त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील त्याच्यामध्ये विलक्षण प्रतिभा आहे."
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी टी-20 संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघ -
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
भारत विरूद्ध न्यूझीलंड वेळापत्रक
18 नोव्हेंबर - पहिला टी-20 सामना, स्काय स्टेडियम, वेलिंग्टन, दुपारी 12 वाजल्यापासून
20 नोव्हेंबर - दुसरा टी-20 सामना, माउंट मौनगानुई, दुपारी 12 वाजल्यापासून
22 नोव्हेंबर - तिसरा टी-20 सामना, मॅक्लीन पार्क, नेपियर, दुपारी 12 वाजल्यापासून
25 नोव्हेंबर - पहिला एकदिवसीय सामना, ईडन पार्क, ऑकलंड, सकाळी 7.30 वाजल्यापासून
27 नोव्हेंबर - दुसरा एकदिवसीय सामना, सेडन पार्क, हॅमिल्टन, सकाळी 7.30 वाजल्यापासून
30 नोव्हेंबर - तिसरा एकदिवसीय सामना, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च, सकाळी 7.30 वाजल्यापासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: New Zealand captain Kane Williamson said that Umran Malik has high expectations and that he will stay in the Indian team for a long time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.