नवी दिल्ली : विश्वचषकात सर्वांची मने जिंकली ती न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने. न्यूझीलंडला केनच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाला गवसणी घालता आली नाही. पण तरीही केनने जे नेतृत्व केले त्याची चर्चा क्रिकेट जगतामध्ये अजूनही कायम आहे. पण आता केनवर बंदी येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
केन हा शांत कर्णधार म्हणून परिचीत आहे. कारण आतापर्यंत एकदाही त्याला रागाच्या भरात कुणीही पाहिलेले नाही. कधी कोणत्या खेळाडूवर वैतागलेला तो दिसला नाही. प्रत्येक वेळी शांत राहून रणनीती रचण्यासाठी केन हा प्रसिद्ध आहे. पण आता त्याच्यावर बंदी का येऊ शकते, हा विचार चाहते करत आहेत.
या गोष्टीची चाहून न्यूझीलंडच्या निवड समितीला लागलेली दिसत आहे. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी केनला संघात स्थान देण्यात आलेले नाही. केनच्याऐवजी न्यूझीलंडचे कर्णधारपद वेगवान गोलंदाज टीम साऊदीकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी आम्ही केनला विश्रांती देत आहोत, असे न्यूझीलंडच्या निवड समितीने म्हटले आहे.
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात केनने गोलंदाजी केली होती. त्याच्या गोलंदाजीबाबत आयसीसीने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता त्याच्या गोलंदाजीची आयसीसी चाचणी घेणार आहे. जर केनची गोलंदाजी आक्षेपार्ह असली तर त्याच्या गोलंदाजीवर बंदी येण्याची शक्यता आहे. केनबरोबर श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजयाची गोलंदाजी शैलीबाबतही आयसीसीने आक्षेप घेतला आहे. या दोघांची आयसीसी चाचणी घेऊ शकते. या चाचणीमध्ये केन आणि अकिला यांची गोलंदाजी वैध ठरली नाही तर त्यांच्या गोलंदाजीवर बंदी घालता येऊ शकते. त्यामुळे आता ही चाचणी कधी होते आणि त्यावर काय निर्णय होतो, याची उत्सुकता आता चाहत्यांना असेल.