Tim Southee । नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार टीम साऊदीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत एक मोठे विधान केले आहे. खरं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारत आणि श्रीलंका हे 2 संघ शर्यतीत आहेत. श्रीलंकेच्या संघाने न्यूझीलंडविरूद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाऊ शकतात. मात्र, किवी संघाचा कर्णधार टीम साऊदीने श्रीलंकेला टोचणारे एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने WTC फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, आता अंतिम फेरीत जाण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी सामना जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी रोहित सेना सज्ज आहे. मात्र, भारतीय संघ हा सामना हरला तर त्यांना श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. जर श्रीलंकेने ती कसोटी मालिका 2-0 ने जिंकली तर भारताचे WTCची फायनल खेळण्याचे स्वप्न भंग होईल.
श्रीलंकेच्या संघाने ही मालिका 1-0 ने जिंकली किंवा मालिका अनिर्णित राहिली, तर त्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळू शकणार नाही. भारताला धक्का देऊन अंतिम फेरीत जाण्यासाठी श्रीलंकेला किवी संघाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत 2-0 असा विजय मिळवावा लागेल. मात्र, चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला हरवल्यास श्रीलंका बाहेर पडेल आणि न्यूझीलंड मालिकेच्या निकालास जास्त महत्त्व राहणार नाही.
आमचे लक्ष पूर्णपणे श्रीलंका मालिकेवर आहे - टिम साऊदी
अशातच न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने म्हटले की, "श्रीलंकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण होईल. आता आमचे लक्ष श्रीलंका मालिकेवर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून आम्ही नक्कीच बाहेर आहोत पण श्रीलंकेला पुढील दोन आठवड्यांत खूप मेहनत घ्यावी लागणार आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: New Zealand captain Tim Southee has claimed that Sri Lanka will have to work harder to play the WTC Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.