न्यूझीलंड क्रिकेटर चॅड बोव्झ (Chad Bowes) याने क्रिकेट जगतात नवा विश्व विक्रम प्रस्थापित केलाय. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने सर्वात जलद द्विशतक झळकावले आहे. याआधी लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतकाचा विक्रम हा भारताचा स्टार बॅटर जगदीशन आणि ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेडच्या नावे होता.
१०३ चेंडूत २०० धावासह सेट झाला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
चॅड बोव्झ (Chad Bowes) याने कँटेरबरीच्या ताफ्यातून खेळताना टागो विरुद्धच्या सामन्यात १०३ चेंडूत द्विशतक साजरे केले. लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक झलले. याआधी ट्रॅविस हेड आणि एन जगदीशन या दोघांनी प्रत्येकी ११४-११४ चेंडूत द्विशतक साजरे केले होते. न्यूझीलंडच्या फलंदाजाने एकाच दणक्यात दोघांना मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. चॅड बोव्झ हा न्यूझीलंड संघाकडून ६ वनडे आणि ११ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळला आहे.
याआधी भारतीय स्टारसह ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाजाने किती चेंडूत साजरं केलं होतं द्विशतक
ऑस्ट्रेलियातील मार्श कप स्पर्धेच्या २०२१-२२ च्या हंगामात ट्रॅविस हेडनं दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना क्वींसलंड विरुद्धच्या सामन्यात जलद द्विशतकी खेळीचा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. भारताच्या एन जगदीशन याने २०२२ च्या विजय हजारे करंडक स्पर्धेत तमिळनाडूकडून खेळताना अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात ११४ चेंडूत द्विशतक झळकावले होते.
न्यूझीलंडच्या क्रिकेटरसाठी विश्व विक्रमी खेळी अविस्मरणीयच आहे. तो आपल्या खेळीबद्दल म्हणाला आहे की, अशी खेळी कधीच प्लान करून साकार होत नाही. नॅच्युरली ती येते. न्यूझीलंडच्या बॅटरची सर्वात जलद द्विशतकी खेळी २७ चौकार आणि ७ षटकारांनी बहरली होती. त्याने ११० चेंडूत २०५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर कँटरबरी संघाने निर्धारित ५० षटकात ९ बाद ३४३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी ओटागो संघ अवघ्या १०३ धावांत आटोपला.