कानपूर: टी-२० मालिकेत किवींनी व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना रंगेल. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. त्यामुळे दोन्ही संघ कसोटी मालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील. पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम स्पर्धेत न्यूझीलंडनंच भारताचा पराभव करत जेतेपद पटकावलं होतं.
कानपूरच्या पहिल्या कसोटीआधी न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी संघाची रणनीती सांगितली. भारताला त्यांच्याच जाळ्यात फसवण्याची योजना किवींनी आखली आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या कसोटीत तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरणार असल्याचे संकेत स्टिड यांनी दिले. भारतात येऊन विजयी होणं सोपं नाही. इथे चार वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू घेऊन उतरता येणार नाही, असं स्टिड म्हणाले.
भारतातील खेळपट्ट्या फिरकीपटूंना मदत करतात. त्यामुळेच परदेशी संघांना भारतात विजय मिळवणं अवघड जातं. मात्र न्यूझीलंडचा संघ तीन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरल्यास फायदा होऊ शकतो. तुम्ही आम्हाला तीन फिरकीपटूंसोबत खेळताना पाहू शकता. मात्र याचा निर्णय खेळपट्टी पाहूनच घेतला जाऊ शकतो. परिस्थिती पाहून आम्हाला रणनीती बदलावी लागेल, असं स्टिड यांनी सांगितलं.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामने होणार आहेत. त्याची सुरुवात २५ नोव्हेंबरपासून होईल. कानपूरमध्ये पहिली कसोटी खेळवली जाईल. तर दुसरी कसोटी ३ डिसेंबरपासून रंगेल. पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचा कर्णधार असेल. दुसऱ्या कसोटीत विराट कोहली संघाचं नेतृत्त्व करेल.