इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल आज लागला. यजमान न्यूझीलंडनं ही कसोटी एक डाव व 65 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात घडलेल्या एका प्रसंगामुळे मात्र न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला जाहीर माफी मागावी लागली. या सामन्यात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा प्रेक्षकांमधून काहींनी जातीवाचक अपमान करण्यात आला. आर्चरनं सोशल मीडियावर घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला माफी मागावी लागली.
न्यूझीलंडनं पहिल्याच कसोटीत इंग्लंडची जिरवली; नोंदवला दणदणीत विजयपहिल्या कसोटीत इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत येणाऱ्या या मालिकेत न्यूझीलंडनं डावानं विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव किवींनी 353 धावांत गुंडाळला. इंग्लंडकडून रोरी बर्न्स ( 52), जो डेन्ली ( 74), बेन स्टोक्स (91) आणि जोस बटलर (43) यांनी साजेशी खेळी केली. न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला नील वॅगनर ( 3/90) आणि कॉलीन डी ग्रँडहोम ( 2/41) यांनी चांगली साथ दिली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं पहिल्या डावात 9 बाद 615 धावा चोपल्या. किवींची सुरुवात साजेशी झाली नाही, परंतु कर्णधार केन विलियम्सन ( 51) खिंड लढवत होता. त्यानंतरही किवी मोठी आघाडी घेणार नाही, असेच चित्र होते. पण, बी जे वॉटलिंग आणि मिचेल सँटनर यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. वॉटलिंगनं 473 चेंडूंत 24 चौकार व 1 षटकार खेचून 205 धावा केल्या, तर सँटनरनं 269 चेंडूंत 11 चौकार व 5 षटकारांसह 126 धावा चोपल्या.
न्यूझीलंडच्या मोठ्या आघाडीचा पाठलाग करताना इंग्लंडवर डावानं पराभव टाळण्याचं आव्हान होतं. त्याच दबावाखाली त्यांचा खेळ सुमार झाला. त्यांना पहिल्या डावातील 353 धावांच्या आसपासही पोहोचता आले नाही. वॅगनरने इंग्लंडचा निम्मा संघ 44 धावांत माघारी पाठवला. सँटनरनेही 3 विकेट्स घेत विजयात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव 197 धावांत आटोपला आणि न्यूझीलंडनं एक डाव व 65 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडनं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पुन्हा 120 गुणांसह दुसरे स्थान पटकावले.