Trent Boult release from central contract : जगातील दिग्गज फलंदाजांना कापरे भरवणारा गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्या धक्कादायक निर्णयाने क्रिकेट वर्तुळाला हादरवून सोडले आहे. कुटुंबियांना वेळ देता यावा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी ट्वेंटी-२०लीग खेळता याव्यात यासाठी बोल्टने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडे त्याला सेंट्रल करारातून वगळण्यात यावे अशी मागणी केली होती आणि ती किवी बोर्डाने मान्य केली आहे. ३३ वर्षीय गोलंदाज आता न्यूझीलंडच्या सेंट्रल करारात नसल्याने संघ निवड करताना त्याचा विचार आधी केला जाणार नाही आणि त्यामुळे बोल्ट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार की नाही, हाही प्रश्न निर्माण झाला आहे.
बोल्टला त्याच्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवायचा आहे आणि स्थानिक क्रिकेट लीगही खेळायच्या आहेत. त्यामुळे त्याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडे विनंती केली होती. बरीच चर्चा केल्यानंतर बोर्डाने त्याची ही विनंती मान्य करून त्याला सेंट्रल करारातून मुक्त केले. बोल्टने कसोटीत ३१७, वन डेत १६९ व ट्वेंटी-२०त ६२ विकेट्स गेतल्या आहेत. करारातून वगळल्यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार कमी दिसणार आहे. पण, संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा आपण उपलब्ध असू असेही त्याने मान्य केले आहे.
ट्रेंट बोल्ट म्हणाला, हा निर्णय सोपा नव्हता आणि माझा त्यामागचा हेतू जाणून तो मान्य केल्याबद्दल क्रिकेट बोर्डाचे आभार. देशासाठी क्रिकेट खेळणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते आणि मी गेली १२ वर्ष राष्ट्रीय संघाकडून खेळतोय, याचा मला अभिमान वाटतोय. हा निर्णय मी पत्नी गेर्ट व तीन मुलांसाठी घेतलाय. कुटुंब हे नेहमी माझे प्रेरणास्रोत राहिले आहे आणि त्यांचा प्राधान्य देणे माझं काम आहे. क्रिकेट नंतरच्या आयुष्याची ही तयारी आहे.
या निर्णयाने राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी कमी होईल, याची कल्पना बोल्टला आहे. तो म्हणाला, राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वकांक्षा अद्याप कायम आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही मी चांगली कामगिरी करू शकतो. पण, आता राष्ट्रीय करार नसल्याने मला हे सत्य स्वीकारावं लागेल की माझी संघात निवड होण्याची संधीही कमी झाली आहे.