भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे दणदणीत विजय मिळवून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. यशस्वी जैस्वालचे द्विशतक, शुबमन गिलचे शतक अन् जसप्रीत बुमराहच्या ९ विकेट्सच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 25 ) दृष्टीने ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. भारतीय संघाला दोन वेळा उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. इंग्लंडला नमवून भारतीय संघाने WTC गुणतालिकेत पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पण, आज आयसीसीच्या ट्विटने भारतीय चाहत्यांची झोप उडवली.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटीचा निकाल आज लागला आणि त्यामुळे टीम इंडियाला झटका बसला आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात ५११ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर गुंडाळून किवींनी सामन्यावर पकड घेतली. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात पदार्पणवीर रचिन रवींद्रने २४० धावांची स्फोटक खेळी केली. कर्णधार केन विलियम्सनने ११८ धावा करताना किवींना ५११ धावांपर्यंत पोहोचवले. आफ्रिकेच्या नेल ब्रँडने ६ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेकडून पहिल्या डावात किगन पीटरसन ( ४५) याने सर्वाधिक धावा केल्या. किवींच्या मॅट हेन्री व मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी ३, तर कायले जेमिन्सन व रवींद्र यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडने दुसरा डाव ४ बाद १७९ धावांवर घोषित केला. केन विलियम्सनने दुसऱ्या डावातही शतक झळकावले. त्याने १०९ धावा केल्या. ५२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संपूर्ण संघ २४७ धावांत तंबूत परतला. डेव्हिड बेडिंगहॅम ( ८७) ने सर्वाधिक धावा केल्या. जेमिन्सनने ४ व सँटनरने ३ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडने हा सामना जिंकून ६६.६६ टक्क्यांसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अव्वल स्थानावर झेप घेतली. इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून भारत ५२.७७ टक्के सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आला होता आणि ऑस्ट्रेलिया ५५ टक्क्यांसह अव्वल स्थानी कायम होते. पण, आता न्यूझीलंड अव्वल झाला आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व बांगलादेश यांचे प्रत्येकी ५० टक्के आहेत.