वेलिंग्टन : टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव १२ धावांनी पराभव करीत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्ध्यांना व्हाईटवॉश दिला. न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्सचे शतक आणि कायल जेमिन्सनचा भेदक मारा सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. मालिका विजयाच्या जोरावर कसोटी रॅंकिंगमध्ये ऑस्ट्रेलियासह अव्वल स्थानदेखील पटकाविले आहे.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विंडीजचा निर्णय सुरुवातीच्या सत्रात चांगला ठरला. कर्णधार टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, विल यंग आणि रॉस टेलर यांना माघारी धाडण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. परंतु मधल्या फळीत हेन्री निकोल्सने सामन्याची सूत्रे स्वत:कडे घेत विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. वॉटलिंग, मिचेल, आणि वॅगनर यांनीही अखेरच्या फळीत महत्त्वपूर्ण खेळी करीत आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. निकोल्सने २८० चेंडूत २१ चौकार आणि एका षटकारासह १७४ धावा केल्या. वॅगनरने नाबाद ६६ धावांची खेळी करून त्याला चांगली साथ दिली. अखेरीस न्यूझीलंडचा पहिला डाव ४६० धावांवर संपवण्यात विंडीजला यश आले. शेनॉन गॅब्रियल, अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी तीन तर जेसन होल्डर आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात विंडीजची सुरुवात खराब झाली. मधल्या फळीत जर्मेन ब्लॅकवूडचा अपवाद वगळता एकही फलंदाज न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याचा सामना करू शकला नाही. साऊदी आणि जेमिन्सन यांच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचे सर्व फलंदाज बाद होत असताना ब्लॅकवूडने एक टोक सांभाळून ६९ धावांची खेळी केली. जेमिन्सन आणि साऊदी यांनी पहिल्या डावात प्रत्येकी पाच फलंदाजांना बाद करीत विंडीजचा पहिला डाव १३१ धावांवर संपवला.
टीम साऊदी याने सामन्यात सात गडी बाद केले. त्याचे एकूण २९६ बळी झाले असून ३०० गडी बाद करणारे रिचर्ड हॅडली आणि डॅनियल व्हेट्टोरी यांच्या पंक्तीत तो बसण्याच्या मार्गावर आहे. या विजयानंतर न्यूझीलंडचे ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने आयसीसी कसोटी क्रमवारीत ११६ गुण झाले. आयसीसी कसोटी गुणतालिकेतही हा संघ इंग्लंडला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला.
पहिल्या डावात ३२९ धावांनी माघारल्यानंतर चौथ्या दिवशी सोमवारी डावाचा पराभव टाळण्यासाठी विंडीजला ८५ धावांची गरज होती. या मालिकेत सर्वोत्तम धावा काढणारा विंडीज संघ ३१७ धावात बाद झाला
Web Title: New Zealand gives Whitewash to West Indies gets top spot in ICC test rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.