Join us  

IRE vs NZ : ४, ४, ६, ४, ६! Michael Bracewellचा वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंडने १ चेंडू व १ विकेट राखून जिंकला सामना 

Ireland vs New Zealand : भारत-इंग्लंड ट्वेंटी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवच्या आतषबाजीने मंत्रमुग्ध झाले असताना दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड यांच्यातल्या वन डे सामन्यात ट्वेंटी-२०चा थरार पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:06 AM

Open in App

Ireland vs New Zealand : भारत-इंग्लंड ट्वेंटी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवच्या आतषबाजीने मंत्रमुग्ध झाले असताना दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड यांच्यातल्या वन डे सामन्यात ट्वेंटी-२०चा थरार पाहायला मिळाला. आयर्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग  करताना किवींचा निम्मा संघ १२० धावांत माघारी परतला होता. पण, सातव्या क्रमांकावर आलेल्या मिचेल ब्रेसवेल ( Michael Bracewell) याने अफलातून खेळ करताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. वन डे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच ५०व्या षटकांत २० धावांचा यशस्वी पाठलाग झाला आणि त्याचे श्रेय ब्रेसवेलला द्यावे लागेल. त्याने ४, ४, ६, ४,६ अशी फटकेबाजी करून  न्यूझीलंडला १ विकेट व १ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडच्या २२ वर्षीय हॅरी टेक्टर ( Harry Tector) याने ११३ धावांची शतकी खेळी करताना किवी गोलंदाजांची धुलाई केली. अँडी मॅकब्रीनने ३९, कर्टीस कॅम्फरने ४३, लोर्कन टकरने २६ व सिमी सिंगने ३० धावांची खेळी करून आयर्लंडला  ९ बाद ३०० धावांपर्यंत पोहोचवले. किवींच्या ल्युकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर व इश सोढी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात किवींचा निम्मा संघ १२० धावांत तंबूत परतला. मार्टीन गुप्तीलने ५१ धावा केल्या, तर कर्णधार टॉम लॅथमने २३ धावा केल्या. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिचेल ब्रेसवेल व ग्लेन फिलिप्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.   

 

फिलिप्स ३८ धावांवर माघारी परतला आणि किवींची अवस्था ६ बाद १५३ अशी झाली. त्यानंतर ब्रेसवेलने एकहाती खिंड लढवली. इश सोढीने २५ धावा करून त्याला साथ दिली. अखेरच्या षटकात किवींना विजयासाठी २० धावांची गरज असताना त्यांच्या हाती एक विकेट होती. ब्रेसवेलने  ४, ४, ६, ४,६ अशी फटकेबाजी केली. त्याने ८२ चेंडूंत १० चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १२७ धावा केल्या.  वन डे क्रिकेटमध्ये ७ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर येऊन ब्रेसवेलने सर्वोत्तम खेळीचा विक्रम नावावर केला.  याआधी केनियाच्या थॉमस ओडोयोने २००७ मध्ये कॅनडाविरुद्ध नाबाद १११ धावा केल्या होत्या. त्याआधी २०१०मध्ये पाकिस्तानच्या अब्दुल रझाकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०९ धावा केलेल्या. 

 

टॅग्स :न्यूझीलंडआयर्लंड
Open in App