Join us  

NZvsSL:  श्रीलंकेने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला दिले टफ टार्गेट, किवींचा संघ इतिहास रचेल तरच भारत WTC Final मध्ये टिकेल!

New Zealand vs Sri Lanka : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील क्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे आणि निकालाच्या जवळ पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 2:10 PM

Open in App

New Zealand vs Sri Lanka : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील क्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे आणि निकालाच्या जवळ पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर २८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १ विकेट गमावून २८ धावा केल्या आहेत. शेवटच्या दिवशी त्यांना विजयासाठी २५७ धावांची गरज असून त्यांच्याकडे नऊ विकेट्स आहेत. न्यूझीलंडने हे लक्ष्य गाठले तर चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना क्राइस्टचर्चमधील हा सर्वात मोठा विजय ठरेल आणि भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील ( WTC Final) तिकिट पक्के होईल. अँजेलो मॅथ्यूजने केलेल्या ११५ धावांमुळे श्रीलंका दुसऱ्या डावात ३०२ धावा करू शकला.   मॅथ्यूजने आपल्या कारकिर्दीतील १४ वे कसोटी शतक झळकावले. 

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारताच्या ७ फलंदाजांनी घडविला इतिहास

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेला मालिकेतील दोन्ही कसोटी जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ही मालिका भारताच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाची आहे. दोनपैकी एकही कसोटी अनिर्णित राहिल्यास भारतीय संघ WTC च्या अंतिम फेरीत जाईल. श्रीलंकेने दोन्ही कसोटी जिंकल्या आणि अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने यश मिळवले तर भारताचे आव्हान संपुष्टात येईल. ऑस्ट्रेलियाने आधिच WTC Final मध्ये जागा पक्की केली आहे. 

श्रीलंकेने चौथ्या दिवसाच्या खेळाला ३ बाद ८३ धावांवरून सुरुवात केली. किवी गोलंदाज नील वॅगनर दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला होता आणि त्याला स्कॅनसाठी जावे लागले. श्रीलंकेने सुरुवातीच्या षटकांतच प्रभात जयसूर्याला गमावले. सहा धावा करून तो ब्लेअर टिकनरचा चौथा बळी ठरला. अशा स्थितीत मॅथ्यूजला दिनेश चंडिमलच्या रूपाने चांगला साथीदार मिळाला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत श्रीलंकेला मजबूत धावसंख्येकडे नेले. चंडिमलने ४२ धावांची खेळी खेळली आणि केवळ दोन चौकार मारले. त्याला टीम साऊदीने बाद करून संघाला मोठे यश मिळवून दिले. 

मॅथ्यूज आणि धनंजय डिसिल्वामध्ये सहाव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. पण २६०च्या एकूण धावसंख्येवर मॅथ्यूजला मेट हेन्रीने बाद केल्याने श्रीलंकेचा डाव लवकरच संपुष्टात आला. श्रीलंकेच्या शेवटच्या पाच विकेट ४२ धावांत पडल्या. यजमान संघाकडून टिकनरने सर्वाधिक चार बळी घेतले, तर मेट हेन्रीने तीन आणि टिम साऊदीने दोन बळी घेतले. किवी संघाला विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. डेव्हॉन कॉनवे ५ धावांवर बाद झाला. टॉम लॅथम (११) आणि माजी कर्णधार केन विल्यमसन (७) खेळत आहेत. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धान्यूझीलंडश्रीलंका
Open in App