Ben Sears ruled out of IND vs NZ Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका उद्यापासून सुरु होत आहे. पहिला सामना १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. पण मालिका सुरू होण्यापूर्वी किवी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. वेगवान गोलंदाज बेन सियर्स हा दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ( knee injury ) बाहेर पडलेल्या सियर्सच्या जागी बदली खेळाडू म्हणून अनकॅप्ड गोलंदाज जेकब डफी ( Jacob Duffy ) याला संधी मिळाली आहे.
दुखापतीमुळे समावेशबाबत आधीपासूनच होती साशंकता
न्यूझीलंडचा युवा गोलंदाज बेन सियर्स डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघासोबत भारतात आला नव्हता. काही दिवसांच्या उपचारानंतर तो भारत दौऱ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा न्यूझीलंडच्या वैद्यकीय पथकाला होती. पण तसे झाले नाही. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. बेन सियर्सच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी जेकब डफी याचा संघात समावेश करण्यात आला. जेकब न्यूझीलंडसाठी वनडे आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, परंतु त्याने अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. अशा स्थितीत किवी संघ त्याला भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पदार्पणाची संधी देऊ शकतो.
असा असेल न्यूझीलंडचा भारत दौरा
बांगलादेश विरुद्ध दणदणीत विजय मिळवलेल्या टीम इंडियाची उद्यापासून तुल्यबळ न्यूझीलंड संघात विरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत तीन सामने असून त्यातील पहिला सामना उद्या बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्याला तर तिसरा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारताने जरी बांगलादेशला पराभूत केले असले तरी न्यूझीलंड संघाला मात्र गेल्या दीड-दोन महिन्यात फारशी चांगली कामगिरी जमलेली नाही. अफगाणिस्तान विरूद्धचा न्यूझीलंडचा कसोटी सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर श्रीलंकेविरूद्ध न्यूझीलंडला २-०ने कसोटी मालिका पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून ते दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील.