Join us  

T20 World Cup होताच कर्णधारपद सोडणार; वर्कलोडमुळे स्टार खेळाडूचा मोठा निर्णय

तीन ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 7:42 PM

Open in App

T20 World Cup 2024 : येत्या तीन ऑक्टोबरपासून यूएईच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांची घोषणा झाली आहे. अशातच न्यूझीलंडच्या ट्वेंटी-२० संघाची कर्णधार सोफी डिव्हाइनने एक मोठी घोषणा करत विश्वचषकाची स्पर्धा संपताच कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ती वन डे संघाच्या कर्णधारपदी मात्र कायम असेल. 

मला दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली ही खूप सन्मानाची बाब आहे. पण, आता मला माझ्या कामाचा ताण थोडा कमी करायचा आहे. कर्णधारपदासह अतिरिक्त जबाबदारी येते आणि मी त्याचा आनंदही घेते. परंतु कधीकधी ते खूप आव्हानात्मक होते. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्याने माझ्या कामाचा ताण थोडा कमी होईल. जेणेकरून मी माझ्या खेळीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकेन. याशिवाय भविष्यासाठी मला आतापासूनच इतर कर्णधारांनाही मदत करायची आहे, असे सोफी डिव्हाइनने सांगितले.

तसेच मी अद्याप वन डे क्रिकेटचे कर्णधारपद सोडले नाही. पण मी कायम या पदावर राहणार असे नाही. त्यामुळे एका वेळी एकाच फॉरमॅटमध्ये कर्णधारपदापासून दूर राहिल्याने पुढच्या कर्णधारांना शिकण्यास आणि सर्वकाही अनुभवण्यास मदत होते, असेही सोफीने नमूद केले. ३४ वर्षीय सोफी डिव्हाइन सध्या पायाच्या दुखापतीतून सावरत आहे. आता ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतून मैदानात पुनरागमन करू शकते.  

विश्वचषकासाठी भारताचा संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024न्यूझीलंड