मुंबई : 2019च्या विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मे महिन्यापर्यंतच खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात बरेच ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू दिसणार नाहीत. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या या निर्णयानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर असताना एक आनंदवार्ता आली आहे.
न्यूझीलंडचे क्रिकेटपटू 2019मध्ये होणाऱ्या आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळणार असल्याची घोषणा न्यूझीलंड क्रिकेटचे व्यवस्थापक जेम्स वेअर यांनी केली. ते म्हणाले, "न्यूझीलंड क्रिकेटने खेळाडूंना आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळण्याची परवानगी दिली आहे. आमच्या खेळाडूंना जास्तीत जास्त अनुभव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आयपीएलमधून त्यांना विविध खेळपट्टींवर खेळण्याची संधी मिळेल.''
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन, टीम साऊदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट आणि मिचेल मॅक्लेघन हे आयपीएलमधील नियमित खेळाडू आहेत. दरम्यान, भारताविरुद्धच्या पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज होत आहे. उभय देशांत पहिली वन डे लढत 23 जानेवारीला नेपीयर येथे होणार आहे.