न्यूझीलंडची महिला फलंदाज सोफी डेव्हीननं रविवारी महिला बिग बॅश लीगमध्ये तुफानी खेळी केली. डेव्हीनच्या खेळीच्या जोरावर अॅडलेड स्ट्रायकर्स संघाने 4 बाद 164 धावा उभ्या केल्या. मेलबर्न स्टार्स संघाला 8 बाद 147 धावा करता आल्या. डेव्हीननं 56 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 85 धावा केल्या. तिला कर्णधार सुझी बेट्सनं 36 धावा करून तोडीसतोड साथ दिली. पण, डेव्हीननं एकाच षटकात पाच षटकार खेचून सर्वांचे लक्ष वेधलं.
प्रथम फलंदाजी करताना डेव्हीन आणि बेट्स यांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावा केल्या. बेट्स 30 चेंडूंत 6 चौकार लगावून 36 धावांवर माघारी परतली. त्यानंतर अॅडलेड स्ट्रायकर्स संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. पण, डेव्हीननं एका बाजूनं फटकेबाजी कायम राखली. विशेष म्हणजे डेव्हिननं अखरेच्या षटकाच्या पाच चेंडूंवर सलग षटकार खेचले. या कामगिरीसह तिनं महिला बिग बॅश लीगमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली. बिग बॅश लीगमध्ये 1000 धावा आणि 50 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करणारी ती दुसरी महिला ठरली आहे. डेव्हीन झोडपण्यापूर्वी मॅडेलीन पेन्ना हीनं पहिल्या तीन षटकांत 19 धावा केल्या. पण, त्या एका षटकानं पेन्नाच्या मेहनतीवर पाणी फिरवलं.
धावांचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्स संघाच्या लिझली ली आणि मिग्नन ड्यु प्रीझ यांनी अर्धशतकी खेळी केली. लीनं 41 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून 52 धावा केल्या. प्रीझनं 51 चेंडूंत 11 चौकारांसह 70 धावा केल्या. ली आणि प्रीझ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली.
पाहा व्हिडीओ...