नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) अखेर न्यूझीलंडचा संघ जाहीर झाला आहे. केन विलियमसनच्या नेतृत्वात पुन्हा एकदा विश्वचषकात न्यूझीलंडचा संघ दिसणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे 35 वर्षीय मार्टिन गुप्टीलला न्यूझीलंडच्या संघात स्थान मिळाले आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर होती मात्र न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 20 सप्टेंबर रोजी संघाची घोषणा केली आहे.
दरम्यान, मार्टिन गुप्टील सातव्यांदा टी-20 विश्वचषक खेळणार आहे. तर पुन्हा एकदा संघाची कमान कॅप्टन कूल केन विलियमसनच्या खांद्यावर असणार आहे. 16 ऑक्टोंबरपासून टी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे आणि 13 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ 19 ऑक्टोंबर रोजी भारताविरूद्ध एक सराव सामना खेळेल.
न्यूझीलंडच्या संघात 3 बदल
न्यूझीलंडच्या मागील विश्वचषकाच्या संघावर नजर टाकली तर आगामी 2022 च्या विश्वचषकासाठी संघात 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. हे तीन बदल वगळले तर संघात कोणताच बदल केलेला नाही. काइल जेमिसन, टॉड एस्टल आणि टिम शिफर्ट यांना वगळण्यात आले आहे, तर यांच्या जागी मिचेल ब्रेसव्हेल, लॉकी फर्ग्युसन आणि फिन ॲलेन यांना स्थान मिळाले आहे.
टी-20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ -केन विलियमसन (कर्णधार), टिम साउदी, ईश सोढी, मिचेल सॅंटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डेरेल मिचेल, ॲडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉव कॉनवे, मार्क चॅपमॅन, मिचेल ब्रेसव्हेल, ट्रेंट बोल्ट, फिन ॲलेन.
खरं तर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पुढच्या महिन्यात मायदेशात होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी देखील संघाची निवड केली आहे. या ट्राय सीरिजमध्ये न्यूझीलंडव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशच्या संघांचा समावेश असणार आहे. ही सीरिज 7 ऑक्टोंबरपासून खेळवली जाईल, ज्याचा अंतिम सामना 14 ऑक्टोंबर रोजी पार पडेल.