अबुधाबी : ‘सध्याच्या काळात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत न्यूझीलंडचा संघ मजबूत संघ आहे,’ असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार माइक आथर्टन यांनी व्यक्त केले. न्यूझीलंडने बुधवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला नमवून स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली.
विशेष म्हणजे आयसीसीच्या सलग तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आथर्टन म्हणाले की, ‘न्यूझीलंडचा संघ क्रिकेटच्या सर्व प्रकारांत शानदार आहे. त्यांनी आणखी एका विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ते २०१९ सालचा विश्वचषक उंचावण्यासाठी अत्यंत जवळ पोहोचले होते. शिवाय पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेचे जेतेपदही त्यांनी पटकावले आहे.’
आथर्टन यांनी पुढे म्हटले की, ‘बुधवारी रात्री अनेक गोष्टी वेगाने बदलली. दुसऱ्या डावात अखेरपर्यंत मला वाटत होते की, सामना इंग्लंडच्या हातात आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानचे पारडे वरचढ दिसत आहे. त्यांचे गोलंदाजी आक्रमण सर्वोत्तम असून त्यात विविधता आहे.’