लंडन: इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका तसेच त्यानंतर १८ जूनपासून भारताविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी न्यूझीलंड संघातील खेळाडू रविवारी ऑकलॅंड ते सिंगापूर असा प्रवास करीत लंडनमध्ये दाखल झाले. काही वेळानंतर सर्व खेळाडू साऊदम्पटनच्या रोझ बाऊलमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या दोन आठवडे आधी सर्वजण येथे वास्तव्यास राहतील. इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी २ जून रोजी लंडनमध्ये सुरू होईल.
सर्व खेळाडू दाखलटीम साऊदी, बी. जे. वाटलिंग, रॉस टेलर आणि नील वॅगनर हे सोमवारी संघात दाखल झाले. आयपीएल स्थगित झाल्यानंतर मालदीव येथे वास्तव्य करणारे कर्णधार केन विलियम्सन, काइल जेमीसन, मिशेल सेंटनर, टीम फिजियो टॉमी सिमसेक आणि ट्रेनर ख्रिस डोनाल्डसन हे देखील संघात दाखल झाले असल्याची माहिती क्रिकेट न्यूझीलंडने दिली.
कोरोना नियमावलीचे पालनन्यूझीलंड संघाने रवाना होण्याआधी कोरोना लस घेतली असून कोरोना चाचणीसह मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत आरोग्य नियमांचे पालन करीत आहे. खेळाडू दोन दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन असतील. चौथ्या ते सहाव्या दिवसादरम्यान प्रत्येकी सहा खेळाडूंच्या गटात सराव होईल. त्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह येणे बंधनकारक असेल. संघातील सर्व खेळाडू २६ ते २८ मे या काळात आपसात तीन सराव सामने खेळणार आहेत. सहा स्थानिक गोलंदाज त्यांना मदत करणार असून सर्व सहा जण आधीपासून क्वारंटाईन असतील.