New Zealand Tour for Pakistan 2022-2023 । नवी दिल्ली : न्यूझीलंड क्रिकेट संघ यावर्षाच्या अखेरीस कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे तब्बल 19 वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या धरतीवर क्रिकेट खेळणार आहे. अलीकडेच इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 मालिका खेळली, ज्यामध्ये इंग्लिश संघाने यजमान पाकिस्तान संघाचा 4-3 ने धुव्वा उडवला. मात्र आता आणखी एक विदेशी संघ पाकिस्तानच्या धरतीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी येणार आहे.
'एप्रिल-मे'मध्ये पुन्हा रंगणार थरार दरम्यान, न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदा दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेतील पहिला सामना 27 ते 31 डिसेंबर दरम्यान कराची येथे खेळवला जाईल, तर दुसरा सामना 4 ते 8 जानेवारी यादरम्यान मुल्तानमध्ये होणार आहे. यानंतर 11, 13 आणि 15 जानेवारीला कराचीमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. यानंतर एप्रिल आणि मे यादरम्यान न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे, जिथे 5 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा थरार रंगणार आहे.
टी-20 मालिकेतील पहिले चार सामने 13, 15, 16 आणि 19 एप्रिल रोजी कराचीमध्ये होतील. तर पाचवा टी-20 सामना आणि पहिले दोन एकदिवसीय सामने अनुक्रमे 23, 26 आणि 28 एप्रिल रोजी होणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील शेवटचे तीन सामने रावळपिंडी येथे 1, 4 आणि 7 मे रोजी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे यादरम्यान भारतात आयपीएलची स्पर्धा रंगली असेल.
तब्बल 19 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर खरं तर यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. मात्र सुरक्षेचे कारण देत न्यूझीलंडने अचानक हा दौरा रद्द केला होता. न्यूझीलंडचा संघ नोव्हेंबर 2003 मध्ये शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेला होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ 24 वर्षांनंतर पाकिस्तानला तर इंग्लंडचा संघ १७ वर्षांनंतर दौऱ्यावर आला होता.
सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"