वेलिंग्टन : टी-२० विश्वचषकातील निराशा झटकून काळजीवाहू कर्णधार हार्दिक पांड्या याने न्यूझीलंड दौरा नवोदितांना संधी देण्यासाठी तसेच त्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी असल्याचे मत मांडले आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत हार्दिक टीम इंडियाचे नेतृत्व करीत आहे.
हार्दिक म्हणाला, ‘मागच्या निकालांवर विचार करण्यावर माझा विश्वास नाही. माझे सहकारी युवा असतील; पण अनुभवाबाबत नवखे नाहीत. यापैकी सर्वांनी आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हा दौरा नव्या खेळाडूंना अधिक संधी प्रदान करण्यासाठी आणि त्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठीच आहे.
‘विश्वचषक संपला. मी निकालही विसरलो. निराशा असली तरी ती मागे टाकून काही गोष्टीत बदल घडवू शकतो. पुढचा मार्ग म्हणून या मालिकेचा विचार सुरू झाला आहे.’