बांगलादेशच्या संघाने पहिल्या कसोटीत अनपेक्षितरित्या न्यूझीलंडला त्यांच्याच घरात पराभूत केले. दुसऱ्या डावात बांगलादेशनेन्यूझीलंडचा १६९ धावांत धुव्वा उडवत कसोटी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत मात्र न्यूझीलंडने तगडी फलंदाजी केली. पहिल्याच दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तब्बल साडेतीनशे धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने १ बाद ३४९ धावापर्यंत मजल मारली. सलामीवीर विल यंगने दमदार अर्धशतक ठोकलं पण त्यानंतर ५४ धावांवर तो बाद झाला. त्याच्या फलंदाजीच्या वेळी एक विचित्र आणि मजेशीर प्रकार घडला.
बांगलादेशचा इबादत हुसेन गोलंदाजी करत होता. त्यावेळी विल यंग २६ धावांवर नाबाद होता. टॉम लॅथमने दमदार फलंदाजी केल्यानंतर विल यंग मात्र संयमी खेळी करत होता. इबादतने टाकलेला चेंडू यंगच्या बॅटला लागला आणि स्लिपमध्ये गेला. स्लिपच्या खेळाडूच्या हाताला लागून चेंडू सुटला आणि सीमारेषेच्या दिशेने गेला. पण दुसऱ्या खेळाडूने चेंडू आतच अडवला. त्या खेळाडूने चेंडू फेकल्यानंतर तो गोलंदाजाच्याही पुढे निघून गेला. त्यामुळे तुफान धावपळ आणि गोंधळ झाला. त्यातच चेंडू समोरच्या दिशेने सीमारेषेला जाऊन लागला. त्यामुळे विल यंगला एका चेंडूवर तब्बल सात धावा मिळाल्या.
मैदानावर झालेला गोंधळ आणि गडबड पाहून काही वेळ अंपायरदेखील हसू आवरू शकले नाहीत. फलंदाजांनाही हसू आवरेनासे झाले. अखेर खेळ पुढे सुरू झाला.
दरम्यान, पहिल्या दिवशी न्यूझीलंडने दमदार कामगिरी केली. पहिल्या दिवशीच्या ९० षटकांच्या खेळात न्यूझीलंडने १ बाद ३४९ धावा केल्या. टॉम लॅथम १८६ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याने आतापर्यंत २८ चौकार लगावले आहेत. तर डेवॉन कॉन्वे ९९ धावांवर नाबाद आहे. त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला आहे.