एका बाजूला 'फॅब फोर'मधील विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात फ्लॉप ठरला. दुसरीकडे केन विलियम्सन याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात धमाकेदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंड स्टारनं १५६ धावांच्या खेळीसह एक नव्हे तर अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. केन विलियम्सन याने ३३ व्या कसोटी शतकासह सर्वाधिक धावा आणि सेंच्युरी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अनेकांना मागे टाकले आहे. इथं एक नजर टाकुयात केन विलियम्सन याने एका डावात साधलेल्या ३ खास विक्रमांवर
ग्रॅहम स्मिथला केलं ओव्हरटेक
केन विलियम्सन याने इंग्लंड विरुद्धच्या धमाकेदार खेळीसह सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर ग्रॅहम स्मिथ याला मागे टाकले. स्मिथनं ११७ कसोटी सामन्यात ९२६५ धावांची नोंद आहे. केनच्या खात्यात आता १०५ कसोटी सामन्यात ९२७६ धावांची नोंद झाली आहे. स्मिथनं ४८.२५ च्या सरासरीनं या धावा काढल्या आहेत. याबाबतीतही केन त्याच्यापेक्षा भारी ठरतो. किवी स्टारनं कसोटीत ५५ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.
स्टीव्ह स्मिथची बरोबरी
'फॅब फोर'मधील आणखी एक चेहरा म्हणजे स्टीव्ह स्मिथ. भारतीय संघाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात त्याने दीड वर्षांचा शतकी दुष्काळ संपवत ३३ वे कसोटी शतक झळकावले होते. कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केन विलियम्सन याने स्टीव्ह स्मिथची बरोबरी केलीये. सध्याच्या घडीला सर्वोत्त चार फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत केन आणि स्टीव्ह स्मिथ संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंडचा जो रूट ३६ शतकांसह टॉपला असून विराट कोहलीनं कसोटीत ३० शतकांची नोंद आहे.
एकाच मैदानात सर्वाधिक शतकांचा विक्रम
केन विलियम्सन याने एकाच मैदानात सातत्याने सर्वाधिक शतके झळकवण्याचा खास विक्रमही आपल्या नावे केलाय. न्यूझीलँड येथील हॅमिल्टनच्या सेडन पार्कच्या मैदानात केन विलियम्सनच्या भात्यातून पाचवे शतक आले. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटर ठरलाय. या मैदानात केननं आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळले असून त्यात ७ शतकाच्या मदतीने जवळपास ९९ च्या सरासरीसह १५८१ धावा केल्या आहेत.