सध्याच्या टी-२० क्रिकेटच्या जमान्यामध्येही कसोटी क्रिकेट आपला रोमांच टिकवून आहे याचा प्रत्यय आज क्रिकेटप्रेमींना आला. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात वेलिंग्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जी नाट्यमयता पाहायला मिळाली त्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे श्वास रोखले गेले. पहिल्या डावात इंग्लंडने उभारलेल्या धावांच्या डोंगरासमोर झटपट गारद होत फॉलोऑनची नामुष्की स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडने सामन्याच्या उत्तरार्धात जी काही कमाल केली त्यामुळे क्रिकेटविश्व अवाक झाले आहे. आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी २५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या इंग्लंडला २५६ धावांवर रोखत न्यूझीलंडने अवघ्या एका धावेने सनसनाटी विजय मिळवला. त्याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये फॉलोऑनची नामुष्की स्वीकारल्यानंतर कसोटी सामना जिंकणारा न्यूझीलंड हा चौथा संघ ठरला आहे.
या सामन्यात इंग्लंडने आपला पहिला डावा ८ बाद ४३५ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ २०९ धावांवर गारद झाला. त्यामुळे यजमान संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली होती. दरम्यान, फॉलोऑन स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडने जबरदस्त खेळ केला. सलामीवीरांनी दिलेल्या शतकी सलामीनंतर केन विल्यमसनने १३२ धावांची झुंजार खेळी केली. तर त्याला टॉम ब्लंडेलने ९० धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. त्या जोरावर न्यूझीलंडने ४८३ धावा फटकावत २५७ धावांची आघाडी मिळवली.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या २५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर १ बाद ४८ धावा काढल्या होत्या. दरम्यान, आज पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर इंग्लंडचे फलंदाज झटपट बाद झाले. ओली रॉबिन्सन (२), बेन डकेट (३३), ओली पोप (१४) आणि हॅरी ब्रुक (०) हे ठराविक अंतराने बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था ५ बाद ८० अशी झाली.
त्यानंतर जो रूट (९५) आणि कर्णधार बेन स्टोक्स (३३) यांनी १२१ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले. मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्याने इंग्लंडचा डाव पुन्हा अडचणीत आला. मग बेन फोक्सने ३५ धावा जोडत इंग्लंडला विजयासमिप नेले. पण विजयासाठी अवघ्या ७ धावांची गरज असताना तो बाद झाला. तर पाठोपाठ जेम्स अँडरसनही बाद झाल्याने इंग्लंडला अवघ्या एका धावेने पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडकडून नील वॅगनरने ४, टीम साऊथीने ३, मॅट हेन्री याने २ विकेट्स मिळवले.
Web Title: New Zealand Vs England : Thrilling till the end, New Zealand did a miracle after the follow-on, England lost by one run, greatest test match in the history of the Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.