भारत विरुद्ध न्यूझीलंड : यजमान न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जसप्रीत बुमराहला विकेटचे खाते उघडता आले असले तरी किवींच्या तळाच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. पदार्पणवीर कायले जेमिसनने गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही कमाल दाखवली. त्याला कॉलीन डी ग्रॅंडहोम आणि ट्रेंट बोल्ट यांची तुल्यबळ साथ मिळाली. भारताच्या १६५ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करताना १८३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. जेमिसनने ४४ धावा चोपल्या आणि त्यात ४ षटकारांचा समावेश होता. ग्रॅंडहोम आणि बोल्ट यांनी अनुक्रमे ४३ आणि ३८ धावा केल्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी आता पाकिस्तानसारखा करिष्मा करावा लागणार आहे.
कायले जेमिसनची ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकेल क्लार्कच्या विक्रमाशी बरोबरी
न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी ५१ धावांची आघाडी घेतली होती, परंतु त्यांचे पाच फलंदाजी माघारी परतले होते. केन विलियम्सनने सर्वाधिक ८९ धावा केल्या. टॉम ब्लंडल ( ३०), रॉस टेलर ( ४४) यांनी न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला न्यूझीलंडचे शेपूट झटपट गुंडाळण्याची संधी होती. पण, कॉलीन डी ग्रँडहोम आणि कायले जेमिसन यांनी ७१ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. ग्रँडहोम ४३ धावा करून माघारी परतला. जेमिसनने ४५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४४ धावा चोपल्या. त्यानंतर ट्रेंट बोल्टने टीम इंडियाच्या गोलंदाजांची चंपी केली. त्यानं २४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ३८ धावा केल्या आणि न्यूझीलंडला पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी मिळवून दिली.
पाकिस्ताननं जे २००३मध्ये करून दाखवलं ते टीम इंडिया आता करणार का?२००३च्या वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात १७० धावांची आघाडी घेतली होती, परंतु पाकिस्तानने तो सामना जिंकून इतिहास रचला होता. न्यूझीलंडमध्ये पहिल्या डावात १५०हून अधिक धावांची आघाडी घेऊनही पराभूत होण्याची नामुष्की प्रथमच एखाद्या संघावर ओढावली होती आणि आता टीम इंडियाला या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.
काय झालेलं त्या सामन्यात?न्यूझीलंडने पहिल्या डावात मार्क रिचर्डसन ( ८२) आणि जेकब ओराम ( ९७) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ३६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव १९६ धावांवर गुंडाळण्यात त्यांना यश आलं. इयान बटलरने ६ विकेट्स घेतल्या. पण, न्यूझीलंडला दुसऱ्या डावात साजेसा खेळ करता आला नाही. शोएब अख्तरच्या ( ६/३०) भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा दुसरा डाव १०३ धावांत गडगडला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य आले. पाकिस्तानने ७ विकेट्स राखून हे आव्हान पार करून विजय मिळवला. मोहम्मद युसूफ ( ८८*), इंझमाम-उल-हक ( ७२*) आणि यासीर हमीद ( ५९) यांनी अर्धशतकी खेळी केली.