भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : टीम साऊदी आणि पदार्पणवीर कायले जेमिसन यांनी टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवावा लागला आणि त्यावेळी टीम इंडियाचे 5 शिलेदार 122 धावांवर माघारी परतले होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला, तेव्हा अजिंक्य रहाणेवर भिस्त होती. पण, साऊदीनं टीम इंडियाच्या शिलेदारांना हाराकिरी पत्करण्यास भाग पाडले. भारताचा उर्वरित निम्मा संघ 43 धावांत माघारी परतला. न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पहिला डाव 165 धावांत गुंडाळला आणि प्रत्युत्तरात ड्रींक्स ब्रेकपर्यंत 1 बाद 63 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण करून न्यूझीलंडनं डाव खेळला. भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी करून किवींना डाव साध्य करण्यास जणू हातभार लावला. पृथ्वी शॉ ( 16), मयांक अग्रवाल ( 34), चेतेश्वर पुजारा ( 11), कर्णधार विराट कोहली ( 2) आणि हनुमा विहारी ( 7) हे आघाडीचे पाच फलंदाज झटपट माघारी परतले. उप कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर मदार होती, परंतु दुसऱ्या दिवशी त्यानेही निराश केले. बाद होण्यापूर्वी रहाणेनं चुकीचा कॉल दिल्यानं रिषभ पंत ( 19) धावबाद झाला. साऊदीनं रहाणेला बाद केले. रहाणेनं 138 चेंडू खेळून 46 धावा केल्या.