भारत विरुद्ध न्यूझीलंड : यजमान न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारताच्या १६५ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करताना १८३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. भारताकडून इशांत शर्मानं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. या दौऱ्यावर येण्यापूर्वी इशांतला रणजी करंडक स्पर्धेत दुखापत झाली होती. त्यानंतर तंदुरुस्ती चाचणी देऊन तो न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आणि संघ व्यवस्थापनानं त्याला पहिल्या सामन्यात खेळवलंही. प्रवासात थकलेल्या इशांतनं पाच विकेट्स घेत संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य ठरवला आणि कपिल देव व झहीर खान या दिग्गजांचा विक्रम मोडला.
जेमिसनने ४४ धावा चोपल्या आणि त्यात ४ षटकारांचा समावेश होता. ग्रॅंडहोम आणि बोल्ट यांनी अनुक्रमे ४३ आणि ३८ धावा केल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी ५१ धावांची आघाडी घेतली होती, परंतु त्यांचे पाच फलंदाजी माघारी परतले होते. केन विलियम्सनने सर्वाधिक ८९ धावा केल्या. टॉम ब्लंडल ( ३०), रॉस टेलर ( ४४) यांनी न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला न्यूझीलंडचे शेपूट झटपट गुंडाळण्याची संधी होती. पण, कॉलीन डी ग्रँडहोम आणि कायले जेमिसन यांनी ७१ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. ग्रँडहोम ४३ धावा करून माघारी परतला. जेमिसनने ४५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४४ धावा चोपल्या. त्यानंतर ट्रेंट बोल्टने टीम इंडियाच्या गोलंदाजांची चंपी केली. त्यानं २४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ३८ धावा केल्या आणि न्यूझीलंडला पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी मिळवून दिली. इशांतने ६८ धावांत ५ फलंदाज बाद केले. कसोटीत त्यानं ११व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.
यासह त्यानं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय जलदगती गोलंदाजाचा मान पटकावला. इशांतच्या नावावर १२१ विकेट्स झाले आहेत. त्यानं झहीर ( १२० विकेट्स) आणि कपिल देव ( ११७) यांचा विक्रम मोडला. जवागल श्रीनाथ ( ८९) आणि मोहम्मद शमी ( ८४) या विक्रमात अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.
टीम इंडियाला विजयासाठी करावा लागेल पाकिस्तानसारखा करिष्मा
कायले जेमिसनची ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकेल क्लार्कच्या विक्रमाशी बरोबरी