भारत विरुद्ध न्यूझीलंड : यजमान न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जसप्रीत बुमराहला विकेटचे खाते उघडता आले असले तरी किवींच्या तळाच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. पदार्पणवीर कायले जेमिसनने गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही कमाल दाखवली. त्याला कॉलीन डी ग्रॅंडहोम आणि ट्रेंट बोल्ट यांची तुल्यबळ साथ मिळाली. भारताच्या १६५ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करताना १८३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. जेमिसनने ४४ धावा चोपल्या आणि त्यात ४ षटकारांचा समावेश होता. ग्रॅंडहोम आणि बोल्ट यांनी अनुक्रमे ४३ आणि ३८ धावा केल्या. जेमिसनने आजच्या खेळीसह ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकेल क्लार्कच्या विक्रमाशी बरोबरी केली.
न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी ५१ धावांची आघाडी घेतली होती, परंतु त्यांचे पाच फलंदाजी माघारी परतले होते. केन विलियम्सनने सर्वाधिक ८९ धावा केल्या. टॉम ब्लंडल ( ३०), रॉस टेलर ( ४४) यांनी न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला न्यूझीलंडचे शेपूट झटपट गुंडाळण्याची संधी होती. पण, कॉलीन डी ग्रँडहोम आणि कायले जेमिसन यांनी ७१ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. ग्रँडहोम ४३ धावा करून माघारी परतला. जेमिसनने ४५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४४ धावा चोपल्या. त्यानंतर ट्रेंट बोल्टने टीम इंडियाच्या गोलंदाजांची चंपी केली. त्यानं २४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ३८ धावा केल्या आणि न्यूझीलंडला पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी मिळवून दिली.
जेमिसनने ४४ धावांच्या खेळीसह न्यूझीलंडकडून पदार्पणात ९व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा ५५ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. १९६५ साली ग्रॅहम विवियन यांचा भारताविरुद्धचा विक्रम जेमिसनने मोडला. जेमिसनने त्याच्या खेळीत ४ खणखणीत षटकार खेचले. कसोटी पदार्पणात एका डावात सर्वाधिक षटकार खेचण्याचा हा एक विक्रमच आहे. यासह क्लार्कनेही पदार्पणात ४ षटकार खेचले होते. क्लार्कने २००४/०५ मध्ये भारताविरुद्ध बंगळुरू कसोटीतून पदार्पण केले होते आणि त्या सामन्यात त्यानं पहिल्याच खेळीत ४ षटकार खेचले होते. विशेष म्हणजे टीम साऊदीच्या नावावर पदार्पणात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम आहे. साऊदीनं २००७/०८मध्ये इंग्लंडविरुद्धच्या नेपीयर कसोटीत ९ षटकार खेचले होते.