भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसरा सामन्यात यजमानांची घसरगुंडी पाहायला मिळाली. मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांच्या दमदार सलामीनंतरही किवींच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. आत्मघातकी फटके आणि धाव घेण्यासाठी केलेली घाई, यानं किवींचा घात केला. भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली. रवींद्र जडेजानं पुन्हा एकदा आपल्या चपळतेची प्रचिती घडवली. भारतीय संघानं पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आज पुनरागमन केले. पण, रॉस टेलरनं पुन्हा एकदा अखेरच्या षटकांत उपयुक्त खेळी करत जोरदार पलटवार केला. त्यानं पदार्पणवीर कायले जॅमिसनला सोबत घेताना नवव्या विकेटसाठी नाबाद 76 धावांची भागीदारी केली.
विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर युजवेंद्र चहलनं ही भागीदारी संपुष्टात आणली. निकोल्स 41 धावा करून पायचीत झाला. गुप्तीलनं फॉर्म कायम राखताना आणखी एक अर्धशतकी खेळी केली. वन डे कारकिर्दीतील त्याचे हे 36वे अर्धशतक ठरले. त्याला टॉम ब्लंडलची साजेशी साथ मिळाली. या दोघांची 49 धावांची भागीदारी शार्दूल ठाकूरनं संपुष्टात आणली. नवदीप सैनीनं ब्लंडलचा ( 22) अप्रतिम झेल टिपला.
त्यानंतर खेळपट्टीवर दोन अनुभवी फलंदाज असल्यानं किवीं मोठा पल्ला गाठेल असे दिसत होते. पण, एक चोरटी धाव घेण्याच्या नादात सेट फलंदाज गुप्तील माघारी परतला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रॉस टेलरनं रिव्हर्स स्वीप खेळला, परंतु चेंडू शार्दूलच्या हाती पोहोचला. तोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवरून गुप्तीलनं क्रिज सोडलं होतं. शार्दूलनं यष्टिरक्षक लोकेश राहुलकडे चेंडू फेकून गुप्तीलला धावबाद केले. गुप्तील 79 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकार खेचून 79 धावांवर बाद झाला.
गुप्तील बाद झाला अन् सामना फिरला...गुप्तीलनंतर किवी फलंदाजांनी तंबूत परतण्याचा सपाटा लावला. टॉम लॅथम आणि जिनी निशॅम हे लगेच माघारी परतले. त्यामुळे टीम इंडियानं सामन्यात पुनरागमन केले. जडेजानं क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा चपळता दाखवताना निशॅमला धावबाद केले. शार्दूलनं किवींना आखणी एक धक्का दिला. कॉलीन डी ग्रँडहोम स्वस्तात बाद झाला. मार्क चॅपमॅन (1)चा युजवेंद्र चहलनं स्वतःच्याच गोलंदाजीवर सुरेख झेल घेतला. चहलचा हा झेल पाहून कर्णधार कोहलीनंही आश्चर्य व्यक्त केलं. 1 बाद 142 वरून न्यूझीलंडची अवस्था 7 बाद 187 अशी दयनीय केली.
पण, रॉसनं जबरदस्त पलटवार करताना अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं शार्दूरनं टाकलेल्या 47 षटकात 17 धावा चोपल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर किवींनी 8 बाद 273 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. रॉसनं नवव्या विकेटसाठी कायले जॅमिसनला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी केली. जॅमिसन 24 चेंडूंत 25 धावांवर ( 1 चौकार व 2 षटकार) नाबाद राहिला. रॉसनं 74 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 73 धावा केल्या