रॉस टेलरनं पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करताना भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. दमदार सुरुवातीनंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीनं शरणागती पत्करली. 1 बाद 142 वरून न्यूझीलंडची अवस्था 7 बाद 187 अशी दयनीय झाली होती. पण, त्यानंतर रॉस टेलर खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्यानं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही त्यानं झोडपलं. या सामन्यात बुमराहनं त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला. विशेषतः जगातील यशस्वी वेगवान गोलंदाजानं स्वकर्मानं ही नामुष्की ओढावून घेतली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसरा सामन्यात यजमानांची घसरगुंडी पाहायला मिळाली. मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांच्या दमदार सलामीनंतरही किवींच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. आत्मघातकी फटके आणि धाव घेण्यासाठी केलेली घाई, यानं किवींचा घात केला. भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली. रवींद्र जडेजानं पुन्हा एकदा आपल्या चपळतेची प्रचिती घडवली. भारतीय संघानं पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आज पुनरागमन केले. पण, रॉस टेलरनं पुन्हा एकदा अखेरच्या षटकांत उपयुक्त खेळी करत जोरदार पलटवार केला. त्यानं पदार्पणवीर कायले जॅमिसनला सोबत घेताना नवव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडनं 8 बाद 273 धावा केल्या.
पहिल्या वन डेत महागडा ठरलेला शार्दूल ठाकूर या सामन्यात यशस्वी ठरला. त्यानं 10 षटकांत 60 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. नवदीप सैनीनं 10 षटकांत 48 धावा दिल्या. रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल यांनी आपापल्या दहा षटकांत अनुक्रमे 58 धावांत 3 आणि 35 धावांत 1 विकेट घेतली. या भारतीय गोलंदाजांत जसप्रीतची कामगिरी चिंतेत टाकणारी ठरली. त्यानं 10 षटकांत 64 धावा दिल्या. वन डे क्रिकेटमध्ये जसप्रीतला सलग तीन सामन्यांत 10 षटकं टाकूनही एकही विकेट घेता आलेली नाही. सलग तीन सामन्यांत विकेट घेण्यात अयपशी ठरण्याची नामुष्की बुमराहवर प्रथमच ओढावली.
पहिल्या वन डेत बुमराहनं 10 षटकांत 53 धावा दिल्या होत्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत त्यानं 10 षटकांत 38 धावा दिल्या होत्या.