सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे धुरंधर सहज पार करतील, असा आत्मविश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण, सामना सुरू झाला अन् अवघ्या 20 षटकातं चेहऱ्यावरील त्या आत्मविश्वासाचे निराशेत रुपांतर झाले. पण, या सामन्यात आणखी एक आगळीवेगळी घटना घडलेली पाहायला मिळाली. न्यूझीलंड संघाचे साहाय्यक क्षेत्ररक्षक प्रशिक्षक ल्युक राँची मैदानावर फिल्डिंग करायला आहे. पण, का?
रॉस टेलरनं पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करताना भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. दमदार सुरुवातीनंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीनं शरणागती पत्करली. 1 बाद 142 वरून न्यूझीलंडची अवस्था 7 बाद 187 अशी दयनीय झाली होती. पण, त्यानंतर रॉस टेलर खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्यानं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांच्या दमदार ( 93 धावा) सलामीनंतरही किवींच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली.
आत्मघातकी फटके आणि धाव घेण्यासाठी केलेली घाई, यानं किवींचा घात केला. भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली. रॉस टेलरनं पुन्हा एकदा अखेरच्या षटकांत उपयुक्त खेळी करत जोरदार पलटवार केला. त्यानं पदार्पणवीर कायले जॅमिसनला सोबत घेताना नवव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडनं 8 बाद 273 धावा केल्या. जॅमिसन 24 चेंडूंत 25 धावांवर ( 1 चौकार व 2 षटकार) नाबाद राहिला. रॉसनं 74 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 73 धावा केल्या
लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉनं दमदार सुरुवात केली, परंतु मयांक अग्रवाल पुन्हा अपयशी ठरला. हॅमिश बेन्नेटनं त्याला तिसऱ्या षटकात स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरकरवी झेलबाद केले. मयांक 3 धावांवर माघारी परतला. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कायले जेमिसन यानं भारताला दुसरा धक्का दिला. त्याच्या अप्रतिम चेंडूवर पृथ्वी शॉच्या यष्टिंचा वेध घेतला. भरताला 34 धावांवर दोन धक्के बसले. टीम साउदीनं त्याच्या भात्यातला आतापर्यंचा अप्रतिम चेंडू टाकून विराट कोहलीचाही त्रिफळा उडवला. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज 57 धावांत माघारी परतले. भारताची ही पडझड इथेच थांबली नाही. कॉलीन डी ग्रँडहोमच्या चेंडूवर कट शॉट मारण्याच्या नादात लोकेश राहुल त्रिफळाचीत झाला.
केदार जाधवला आज मोठी खेळी करून स्वतःचे स्थान आणखी पक्क करण्याची संधी होती. पण, त्यानंही निराश केले. तो अवघ्या 9 धावा करून माघारी परतला. श्रेयस अय्यरनं फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळी केली. त्यानं 57 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 52 धावा केल्या. पण, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर चुकीचा फटक मारून तोही माघारी परतला. शार्दूल ठाकूरनं फटकेबाजी करून भारतीय चाहत्यांचे मनोरंजन केले, परंतु ग्रँडहोमच्या अप्रतिम चेंडूंन त्याचा त्रिफळा उडवला. सामन्याच्या 37व्या षटकात किवीचं क्षेत्ररक्षक साहाय्यक प्रशिक्षक राँची फिल्डिंगसाठी मैदानावर आले. राँची 2017मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा खेळला होता.
किवी संघाला दुखापतीचे ग्रहणन्यूझीलंड संघाला दुखापतीचे ग्रहण लागलेले आहे. केन विलियम्सनने दुखापतीमुळे पहिल्या दोन वन डे सामन्यातून माघार घेतली आहे. त्यात स्कॉट कुग्गेलेईजनला ताप आला आणि मिचेल सँटनरच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे राँची बदली खेळाडू म्हणून काही काळ मैदानावर फिल्डींगसाठी आले.