भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेत यजमानांनी विजयी सलामी दिली. ट्वेंट-20 मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर वन डे मालिकेतील हा विजय न्यूझीलंड संघाचे मनोबल उंचावणारा ठरला आहे. पण, दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंडचा गोलंदाज स्कॉट कुग्गेलेइजन आजारी पडला आहे आणि त्यानं या सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी न्यूझीलंड संघानं त्यांच्या सर्वात उंच गोलंदाजाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड संघात बदलाचे वारे असताना टीम इंडियाही आव्हान वाचवण्यासाठी उद्याच्या सामन्यात दोन बदल करू शकते.
NZ vs IND : न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यात सर्वात उंच खेळाडूला संधी देणार, Team Indiaची चिंता वाढणार!
न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे कडवे आव्हान 4 विकेट्स राखून परतवले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकांत 4 बाद 347 धावांचा एव्हरेस्ट उभारल्यानंतर यजमानांनी शांतपणे खेळ करताना 48.1 षटकांतच 6 बाद 348 धावा करुन बाजी मारली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर नाबाद 109 धावा करुन सामनावीर ठरला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर ( 103), लोकेश राहुल ( नाबाद 88) आणि विराट कोहली ( 51) यांनी दमदार खेळी केली होती. त्याला न्यूझीलंडच्या रॉस टेलर ( नाबाद 109), हेन्री निकोल्स ( 78) आणि टॉम लॅथम ( 69) यांनी तोडीत तोड उत्तर दिले.
आता दुसरा सामना शनिवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ईडन पार्कवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 8 वन डे सामने झाले आणि त्यात यजमान 4-3 असे आघाडीवर आहेत. एक सामना बरोबरीत सुटला होता. पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियानं पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल ही नवीन जोडी मैदानावर उतरवली. या जोडीनं वन डे सामन्यात पदार्पण करताना अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे उद्याच्या सामन्यातही हीच जोडी सलामीला खेळण्याची शक्यता अधिक आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल हे संघात फिट आहेतच. केदार जाधव की मनीष पांडे यांच्यापैकी कुणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे.
मनीषला न खेळवल्यामुळे कोहलीवर टीका झाली होती. पण, केदारनं 15 चेंडूंत 26 धावांची नाबाद खेळी करून निवड सार्थ ठरवली. कोहलीनं त्याला गोलंदाजी का दिली नाही, हा सतावणारा प्रश्न आहेच. अष्टपैलू म्हणून केदारच्या जोडीला उद्या रवींद्र जडेजा कायम दिसणार आहे. गोलंदाजीत कोहली दोन महत्त्वाचे बदल करू शकतो. पहिल्या सामन्यात कुलदीप यादवनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या होत्या. पण, त्याचवेळी त्यानं 10 षटकांत 84 धावा दिल्या, त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कोहली कुलदीपच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देऊ शकतो. या सामन्यात शार्दूल ठाकूरही ( 9 षटकांत 80 धावा) महागडा ठरला होता. त्यालाही बाकावर बसवले जाऊ शकते आणि नवदीप सैनी अंतिम अकरामध्ये प्रवेश करू शकतो.
Video : 'जम्बो' Anil Kumbleनं जेव्हा पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला पाणी पाजलं होतं...
IPL 2020 : राजस्थान रॉयल्स संघातील Jofra Archerची रिक्त जागा भरण्यासाठी तिघं शर्यतीत