भारत विरुद्ध न्यूझीलंड : मालिका गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीला पुन्हा अपयश आलं. मयांक अग्रवाल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतेल, तर पृथ्वी शॉला मोठी खेळी करता आली नाही. पण, लोकेश राहुलनं सातत्यपूर्ण खेळ करताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. लोकेशनं वैयक्तिक शतकी खेळीसह श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांच्यासह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऐतिहासिक कामगिरी केली. 2009नंतर प्रथमच भारतीय फलंदाजांना असा पराक्रम करता आला आहे.
लोकेश राहुलची बॅट तळपली, टीम इंडियानं मोठी मजल मारली
तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि विराट कोहली ( 9) स्वस्तात माघारी परतले. पृथ्वी शॉ फटकेबाजी करत होता, परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळनं त्याची विकेट पडली. पृथ्वी 42 चेंडूंत 40 धावा करून धावबाद झाला. भारताचे तीन फलंदाज 62 धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीनं चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण, लोकेश व श्रेयस यांची शतकी भागीदारी जेम्स निशॅमनं संपुष्टात आणली. त्यानं श्रेयसला बाद केले. श्रेयसनं 63 चेंडूंत 62 धावा केल्या.
केदार जाधवच्या जागी आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मनीष पांडेनं पाचव्या विकेटसाठी लोकेशसह शतकी भागीदारी केली. लोकेश 113 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 112 धावांवर माघारी परतला. मनीष पांडेही पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्यानं 42 धावा केल्या. भारतानं 50 षटकांत 7 बाद 296 धावा केल्या. या सामन्यात भारतानं चौथ्या व पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. 2009नंतर टीम इंडियानं एकाच सामन्यात चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूण चार वेळा भारतीय फलंदाजांनी एकाच सामन्यात दोन्ही क्रमांकासाठी शतकी भागीदारी केल्या होत्या.
- 1 एप्रिल 1998 - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन ( 82) आणि अजय जडेजा ( 105*) यांनी चौथ्या विकेटसाठी 104 धावा जोडल्या, तर जडेजा व हृषिकेश कानेटकर ( 57) यांनी पाचव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. भारताच्या 5 बाद 309 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 268 धावांत माघारी परतला.
- 24 जानेवारी 2004 - भारतानं अवघ्या 3 धावांनी झिम्बाब्वेविरुद्ध सामना जिंकला होता. या सामन्यात राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी चौथ्या विकेटसाठी 133, तर लक्ष्मण आणि रोहन गावस्कर यांनी पाचव्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी करताना टीम इंडियाला 7 बाद 280 धावांपर्यंत मजल मारून दिली. झिम्बाब्वेचा संघ 6 बाद 277 धावाच करू शकला.
- 28 ऑक्टोबर 2009 - भारतानं 99 धावांनी ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय नोंदवला होता. प्रथम फंलदाजी करताना भारतानं 7 बाद 354 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव 255 धावांत गुंडाळला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर आणि धोनी व सुरेश रैना यांनी अनुक्रमे चौथ्या व पाचव्या विकेटसाठी 119 व 136 धावांची भागीदारी केली.
- 11 फेब्रुवारी 2020 - आजच्या सामन्यात लोकेश राहुल व श्रेयस अय्यर आणि लोकेश व मनीष पांडे यांनी अनुक्रमे चौथ्या व पाचव्या विकेटसाठी 100 व 107 धावांची भागीदारी केली.
लोकेश राहुलची लै भारी कामगिरी; महेंद्रसिंग धोनीही ठरला होता अपयशी
जे कोहलीलाही जमलं नाही, ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं; पटकावलं अव्वल स्थान
श्रेयस अय्यरनं 'सिक्सर'किंग युवराज सिंगचा विक्रम मोडला, चौथ्या क्रमांकावरील यशस्वी फलंदाज ठरला