भारत विरुद्ध न्यूझीलंड : ट्वेंटी-20 मालिकेतील अपयश विसरून न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दमदार कमबॅक केले. त्यांनी जगातील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीम इंडियावर निर्भेळ यश मिळवलं. न्यूझीलंडनं तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी जिंकून भारताला व्हाईटवॉश दिला. भारतीय संघाला 31वर्षांनतर अशा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावं लागलं.
मालिका गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीला पुन्हा अपयश आलं. मयांक अग्रवाल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतेल, तर पृथ्वी शॉला मोठी खेळी करता आली नाही. पण, लोकेश राहुलनं सातत्यपूर्ण खेळ करताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. लोकेशनं वैयक्तिक शतकी खेळीसह श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांच्यासह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. श्रेयसनं 63 चेंडूंत 62 धावा केल्या. लोकेश 113 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 112 धावांवर माघारी परतला. मनीष पांडेही पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्यानं 42 धावा केल्या. भारतानं 50 षटकांत 7 बाद 296 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांनी सावध सुरुवात करताना पहिल्या दहा षटकांत एकही विकेट न गमावता 65 धावा करून दिल्या. 12व्या षटकात अर्धशतकवीर मार्टीन गुप्तीलला धावबाद करण्याची संधी लोकेश राहुलनं दवडली. त्यामुळे या जोडीनं अर्धशतकी भागीदारीचे रुपांतर शतकात केले. न्यूझीलंडनं 15व्या षटकात शतकी पल्ला पार केला. 17व्या षटकात युजवेंद्र चहलनं टाकलेल्या अप्रतिम चेंडूंनं गुप्तीलच्या यष्टिंचा वेध घेतला. गुप्तील 46 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार खेचून 66 धावांवर माघारी परतला. चहलनं ही विकेट घेत गुप्तील व निकोल्स यांची 106 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पण, हेन्री निकोल्सनं अर्धशतकी खेळी करताना केन विलियम्सच्या सोबत संघाची घोडदौड कायम राखली.
निकोल्स आणि केन यांची अर्धशतकी भागीदारी चहलनं संपुष्टात आणली. केन 22 धावा करून माघारी परतला. पहिल्या दोन सामन्यांत तुफान फटकेबाजी करणारा रॉस टेलरही स्वस्तात माघारी परतला. रवींद्र जडेजानं त्याला कोहलीकरवी झेलबाद केले. पुढच्याच षटकात शार्दूल ठाकूरनं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं हेन्री निकोल्सला बाद केले. निकोल्सनं 103 चेंडूंत 9 चौकारांसह 80 धावा केल्या. जिमी निशॅम व टॉम लॅथम यांना मोठी भागीदारी करता आली नाही. चहलनं किवींना आणखी एक धक्का दिला. चहलनं 10 षटकांत 1 निर्धाव षटक टाकून 47 धावांत 3 विकेट्स घेतल्या. पण, लॅथम आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून किवींचा विजय पक्का केला. ग्रँडहोमनं 21 चेंडूंत अर्धशतक झळकावलं. ग्रँडहोम आणि लॅथम या दोघांनी नाबाद 80 धावांची भागीदारी केली. ग्रँडहोम 28 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह 58 धावांवर, तर लॅथम 34 चेंडूंत 32 धावांवर नाबाद राहिला.
या पराभवानंतर टीम इंडियावर 31 वर्षांनी व्हाईटवॉश पत्करण्याची नामुष्की ओढावली. तीन किंवा त्यापेक्षा अधिक द्विदेशीय वन डे मालिकेत भारताला तिसऱ्यांदा व्हाईटवॉश पत्करावा लागला आहे. यापूर्वी 1983/84 आणि 1988/89 मध्ये वेस्ट इंडिजनं 5-0 असा विजय मिळवला होता. त्यानंतर आज न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला 3-0 अशी हार मानण्यास भाग पाडले.
त्यानंतरही भारताचा दारूण पराभव झाला, परंतु त्यात पाऊस त्यांच्या मदतीला धावला- भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2-0 ( 2013-14), पराभूत ( तिसरा सामना रद्द)- भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 4-0 ( 2006-07), पराभूत ( पहिला सामना रद्द) - भारताचा श्रीलंका दौरा 3-0 ( 1997), पराभूत, ( एक सामना रद्द)
टीम इंडियाच्या फलंदाजांनी इतिहास रचला; जवळपास दहा वर्षांनंतर प्रथमच हा पराक्रम केला
लोकेश राहुलची बॅट तळपली, टीम इंडियानं मोठी मजल मारली
लोकेश राहुलची लै भारी कामगिरी; महेंद्रसिंग धोनीही ठरला होता अपयशी
जे कोहलीलाही जमलं नाही, ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं; पटकावलं अव्वल स्थान
श्रेयस अय्यरनं 'सिक्सर'किंग युवराज सिंगचा विक्रम मोडला, चौथ्या क्रमांकावरील यशस्वी फलंदाज ठरला