भारत विरुद्ध न्यूझीलंड : आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. अय्यर आणि लोकेश या दोघांनी शतकी भागीदारी केली. अर्धशतकी खेळीनंतर श्रेयस माघारी परतला. त्यानंतर लोकेश आणि मनीष पांडे यांनीही दमदार खेळ करताना शतकी भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं समाधानकारक पल्ला गाठला. लोकेशनं खणखणीत शतकी खेळी करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.
जे कोहलीलाही जमलं नाही, ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं; पटकावलं अव्वल स्थान
श्रेयस अय्यरनं 'सिक्सर'किंग युवराज सिंगचा विक्रम मोडला, चौथ्या क्रमांकावरील यशस्वी फलंदाज ठरला
तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि विराट कोहली ( 9) स्वस्तात माघारी परतले. पृथ्वी शॉ फटकेबाजी करत होता, परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळनं त्याची विकेट पडली. पृथ्वी 42 चेंडूंत 40 धावा करून धावबाद झाला. भारताचे तीन फलंदाज 62 धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. या जोडीनं टीम इंडियाच्या धावांची गती वाढवली.
श्रेयसनं मालिकेतील फॉर्म कायम राखताना सलग तिसऱ्यांदा 50+ खेळी केली. यासह त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडमध्ये सलग तीन वन डे सामन्यांत 50+ खेळी करणारा श्रेयस हा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 2014च्या न्यूझीलंड दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनीनं अशी कामगिरी केली होती. पण, लोकेश व श्रेयस यांची शतकी भागीदारी जेम्स निशॅमनं संपुष्टात आणली. त्यानं श्रेयसला बाद केले. श्रेयसनं 63 चेंडूंत 62 धावा केल्या. श्रेयसपाठोपाठ लोकेशनंही आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
केदार जाधवच्या जागी आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मनीष पांडेनं पाचव्या विकेटसाठी लोकेशसह अर्धशतकी भागीदारी केली. भारतानं 40 षटकांत दोनशेचा पल्ला गाठून पाचची सरासरी कायम राखली होती. लोकेश राहुलनं शतक पूर्ण करताना आगळ्या वेगळ्या पंक्तीत स्थान पटकावले. आशियाई देशांबाहेर पाचव्या क्रमांकावर शतक झळकावणारा लोकेश तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी युवराज सिंगन ऑस्ट्रेलिया व झिम्बाब्वे आणि सुरेश रैनानं न्यूझीलंड व इंग्लंड येथे अशी कामगिरी केली आहे.
वन डे क्रिकेटमधील हे त्याचे चौथे शतक ठरले. या शतकासह त्यानं विराट कोहलीचा विक्रम मोडला. सर्वात कमी डावांमध्ये चार वन डे शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांत लोकेशनं दुसरं स्थान पटकावलं. त्यानं 31 डावांमध्ये हा पराक्रम केला. शिखर धवन ( 24 डाव ) अव्वल स्थानी आहे. कोहलीला चार शतकं झळकावण्यासाठी 36 डाव खेळावे लागले होते. लोकेश 113 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 112 धावांवर माघारी परतला. न्यूझीलंडमध्ये शतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय यष्टिरक्षक ठरला. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 85 धावा या सर्वोत्तम होत्या.
21 वर्षांनंतर भारतीय यष्टिरक्षकानं आशियाई देशांबाहेर शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1999मध्ये राहुल द्रविडनं श्रीलंकेविरुद्ध 155 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे महेंद्रसिंग धोनीला 350 वन डे सामने खेळूनही आशियाई देशाबाहेर शतक झळकावता आलेले नाही.