भारत विरुद्ध न्यूझीलंड : आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. अय्यर आणि लोकेश या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला दोनशेसमीप नेले. अर्धशतकी खेळीनंतर श्रेयस माघारी परतला, परंतु त्यानं कर्णधार विराट कोहलीलाही न जमलेला पराक्रम करून दाखवला.
तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि विराट कोहली ( 9) स्वस्तात माघारी परतले. पृथ्वी शॉ फटकेबाजी करत होता, परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळनं त्याची विकेट पडली. पृथ्वी 42 चेंडूंत 40 धावा करून धावबाद झाला. भारताचे तीन फलंदाज 62 धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीनं चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. या जोडीनं टीम इंडियाच्या धावांची गती वाढवली.
श्रेयसनं मालिकेतील फॉर्म कायम राखताना सलग तिसऱ्यांदा 50+ खेळी केली. यासह त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडमध्ये सलग तीन वन डे सामन्यांत 50+ खेळी करणारा श्रेयस हा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 2014च्या न्यूझीलंड दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनीनं अशी कामगिरी केली होती. पण, लोकेश व श्रेयस यांची शतकी भागीदारी जेम्स निशॅमनं संपुष्टात आणली. त्यानं श्रेयसला बाद केले. श्रेयसनं 63 चेंडूंत 62 धावा केल्या. श्रेयसपाठोपाठ लोकेशनंही आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
कारकिर्दीतील पहिल्या 16 वन डे डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम श्रेयसनं नावावर केला. या विक्रमात जगभरातील फलंदाजांमध्ये पाकिस्तानचा इमाम-उल-हक 819 धावांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर केव्हीन पीटरसन ( 788), फाखर जमान ( 770), टॉम कूपर ( 763) हे आघाडीवर आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये श्रेयस अव्वल ठरला आहे. त्यानं कारकिर्दितील पहिल्या 16 वन डे डावांमध्ये 748 धावा केल्या. त्यानं नवज्योत सिंग सिद्धू यांचा 725 धावांचा विक्रम मोडला. विराटला 655 धावाच करता आल्या होत्या.
यस अय्यरनं 'सिक्सर'किंग युवराज सिंगचा विक्रम मोडला, चौथ्या क्रमांकावरील यशस्वी फलंदाज ठरला