भारत विरुद्ध न्यूझीलंड : तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि विराट कोहली ( 9) स्वस्तात माघारी परतले. पृथ्वी शॉ फटकेबाजी करत होता, परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळनं त्याची विकेट पडली. पृथ्वी 42 चेंडूंत 40 धावा करून धावबाद झाला. भारताचे तीन फलंदाज 62 धावांवर माघारी परतले होते.
लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. या जोडीनं टीम इंडियाच्या धावांची गती वाढवली. श्रेयसनं मालिकेतील फॉर्म कायम राखताना सलग तिसऱ्यांदा 50+ खेळी केली. यासह त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडमध्ये सलग तीन वन डे सामन्यांत 50+ खेळी करणारा श्रेयस हा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 2014च्या न्यूझीलंड दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनीनं अशी कामगिरी केली होती. पण, लोकेश व श्रेयस यांची शतकी भागीदारी जेम्स निशॅमनं संपुष्टात आणली. त्यानं श्रेयसला बाद केले. श्रेयसनं 63 चेंडूंत 62 धावा केल्या.
या कामगिरीसह श्रेयस अय्यरनं युवराज सिंगचा विक्रम मोडला. तीन सामन्यांच्या द्विदेशीय वन डे मालिकेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम श्रेयसनं नावावर केला. श्रेयसनं या मालिकेत 103, 52 आणि 62 अशा एकून 217 धावा केल्या. हा भारताकडून द्विदेशीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. यापूर्वी युवराज सिंगनं 2017मध्ये इंग्लंडविरुद्ध 210 धावा केल्या होत्या. त्यानं 2005सालचा ( वि. पाकिस्तान) राहुल द्रविडचा 209 धावांचा विक्रम मोडला होता.
एकाच मालिकेत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी दोन शतकी भागीदारी करण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांनी 2007मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन शतकी भागीदारी केल्या होत्या. आताच्या न्यूझीलंड मालिकेत श्रेयस आणि लोकेश राहुल यांनी दोन शतकी भागीदारी केल्या आहेत.