भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आज संपला. या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. हा पराभव भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र हा लाजीरवाणा पराभव काही मोठी गोष्ट असल्याचे वाटत नाही.
पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा १० गडी राखून पराभव केला आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावापाठोपाठ दुसऱ्या डावातही हाराकिरी केली. दुसऱ्या डावात भारताला १९१ धावा करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर अवघ्या ९ धावांचं आव्हान होतं. ते न्यूझीलंडनं अगदी सहज गाठलं आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. गोलंदाजांचा भेदक मारा आणि त्यांना फलंदाजांनी दिलेली साथ हे न्यूझीलंडच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.
या पराभवानंतर कोहली हा पत्रकारांना उत्तर देण्यासाठी आला होता. यावेळी त्याला या पराभवाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी हा पराभव म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, असे धक्कादायक विधान केले आहे. पण भारतीय संघ आता ही मालिका जिंकू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
या पराभवानंतर कोहली पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला की, " मला माहिती आहे की, या सामन्यात आमच्याकडून चांगला खेळ झाला नाही. पण काही लोकं या पराभवाला जास्त महत्व देत आहेत. पण आमच्यासाठी हा फक्त एक कसोटी सामना आहे. एका कसोटी सामन्यात पराभव झाला, ही गोष्ट आपण स्वीकारायला हवी. पण त्याची एवढी मोठी गोष्ट करता कामा नये."
कोहली पुढे म्हणाला की, " काही लोकांसाठी तर हा पराभव म्हणजे जगाचा अंत झाल्यासारखा वाटत आहे. पण माझ्यासाठी हा पराभव ही एवढी मोठी गोष्ट नक्कीच नाही. कारण आम्ही हा पराभव स्वीकारला आहे. या पराभवातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले आहे. आता हा पराभव उगाळण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही आता दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागले आहोत."