भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना उद्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळवण्यात येणार आहे. यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शनिवारी होणारा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा त्यांचा निर्धार आहे. दुसरीकडे ट्वेंटी-20 मालिकेतील निर्भेळ ( 5-0) यशानंतर वन डे मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य आहे. त्यामुळे दुसऱ्या वन डेत बाजी मारून मालिकेतील आव्हान कायम राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. सहा वर्षांनंतर उभय संघ ऑकलंडच्या ईडन पार्कवर वन डे सामना खेळणार आहेत. उभय संघांमध्ये ईडन पार्कवर 2014 झालेला तो अखेरचा वन डे सामना प्रचंड चुरशीचा झाला होता. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं त्या सामन्याची आठवण करून देताना टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. असं नेमकं काय घडलं होतं त्या सामन्यात?
NZ vs IND : न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यात सर्वात उंच खेळाडूला संधी देणार, Team Indiaची चिंता वाढणार!
न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे कडवे आव्हान 4 विकेट्स राखून परतवले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकांत 4 बाद 347 धावांचा एव्हरेस्ट उभारल्यानंतर यजमानांनी शांतपणे खेळ करताना 48.1 षटकांतच 6 बाद 348 धावा करुन बाजी मारली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर नाबाद 109 धावा करुन सामनावीर ठरला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर ( 103), लोकेश राहुल ( नाबाद 88) आणि विराट कोहली ( 51) यांनी दमदार खेळी केली होती. त्याला न्यूझीलंडच्या रॉस टेलर ( नाबाद 109), हेन्री निकोल्स ( 78) आणि टॉम लॅथम ( 69) यांनी तोडीत तोड उत्तर दिले. आता दुसरा सामना शनिवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ईडन पार्कवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 8 वन डे सामने झाले आणि त्यात यजमान 4-3 असे आघाडीवर आहेत. एक सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे उद्याच्या सामन्यात काय होईल, याची सर्वांना उत्सुकता आहे.
25 जानेवारी 2014या दिवशी न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातला वन डे सामना ईडन पार्कवर झाला होता. त्यानंतर सहा वर्षांनी उभय संघ येथे वन डे सामना खेळणार आहेत. मार्टिन गुप्तीलची शतकी खेळी, त्याला केन विलियम्सनच्या अर्धशतकाची मिळालेली साथ, भारताकडून कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या तळाच्या फलंदाजांनी दिलेलं उत्तर, हे सर्व डोळ्यासमोर उभं राहत आहे. काय घडलं होतं तेव्हा, चला जाणून घेऊया...
पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिले दोन सामने यजमानांनी जिंकले होते. टीम इंडियाच्या दृष्टीनं मालिकेतील निर्णायक सामना ईडन पार्कवर खेळवण्यात झाला. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 314 धावांचा डोंगर उभा केला. मार्टीन गुप्तीलनं 129 चेंडूंत 12 चौकार व 2 षटकार खेचताना 111 धावा चोपल्या. केन विलियम्सननं 74 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 65 धावा केल्या. ल्युक राँचीनं 38 आणि टीम साउदीनं 27 धावांची छोटेखानी खेळी करताना संघाच्या धावसंख्येत भर घातली. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण, कोरे अँडरसननं दोघांना माघारी पाठवले. विराट कोहली व अजिंक्य रहाणे एकेरी धाव करून तंबूत परतले. भारताचे 4 फलंदाज 79 धावांवर माघारी परतले होते. पण, त्यानंतर सुरेश रैना आणि कर्णधार धोनीनं खिंड लढवली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रैना 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर धोनी 50 धावा करून माघारी परतला. विजयासाठी 131 धावा आणि भारताचे केवळ चार फलंदाज शिल्लक होते. अशाच टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता.
पण, घडलं काही वेगळंच...आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी खेळपट्टीवर नांगर टाकला. या दोघांनी 7 व्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी करून सामना पुन्हा भारताच्या बाजूनं झुकवला. नॅथन मॅकलमनं 45 व्या षटकात अश्विनला ( 65) बाद केले. त्यानंतर प्रविण कुमार व मोहम्मद शमीही त्वरीत बाद झाले. अखेरच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. जडेजा आणि वरुण अॅरोन खेळपट्टीवर होते. कोरे अँडरसनच्या त्या षटकातील पहिल्या चेंडूवर जडेजानं चौकार खेचला आणि दुसरा चेंडू वाईड गेला. पण, पुढील दोन चेंडू निर्धाव राहिले. चौथा चेंडूही वाईड गेला. त्यामुळे 4 चेंडूंत 12 असा सामना चुरशीचा झाला. जडेजानं सलग दोन चेंडूंवर चौकार व षटकार खेचून 1 चेंडू 2 धावा असा सामना झुकवला. पण, जडेजाला त्या चेंडूवर एकच धाव घेता आली आणि सामना बरोबरीत सुटला.
कोरे अँडरसननं टीम इंडियाचा निम्मा संघ माघारी पाठवला.
Video : 'जम्बो' Anil Kumbleनं जेव्हा पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला पाणी पाजलं होतं...
IPL 2020 : राजस्थान रॉयल्स संघातील Jofra Archerची रिक्त जागा भरण्यासाठी तिघं शर्यतीत