क्राइस्टचर्च – जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर जसा परिणाम झाला तसा क्रिडा क्षेत्रावरही परिणाम झाला, मात्र आता हळूहळू सर्व खेळाडू आणि बोर्ड सुरक्षेची खबरदारी घेऊन पुन्हा मैदानात उतरले आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आलीय ती म्हणजे पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये ६ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
इतकचं नाही तर न्यूझीलंड दौऱ्यावर असणाऱ्या पाकिस्तानी टीमवर तेथील क्रिकेट बोर्डाने गंभीर आरोप लावले आहेत, पाकिस्तानी खेळाडूंनी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले आणि आता या खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवावं लागणार आहे, त्यामुळे कोणताही सराव करता येणार नाही. बाबर आजम याच्या नेतृत्वात पाकिस्तानी टीम न्यूझीलंड दौऱ्यावर पोहचली आहे, याठिकाणी त्यांना १४ दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे.
ज्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा त्यातील ६ खेळाडूंचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितले की, या सहामधील २ चाचणी अहवाल जुने आहेत तर ४ नवीन आहे. या खेळाडूंच्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही. या सर्व खेळाडूंना विलगीकरण केंद्रात ठेवलं आहे. पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर तीन T 20 आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी आले आहेत.
सध्या पाकिस्तान खेळाडूंचा सराव थांबवण्यात आला आहे, जोपर्यंत चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत सराव करण्यावर बंदी ठेवली आहे, विलगीकरणाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानी टीममधील काही खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन केले, त्यानंतर या खेळाडूंना नियमांची जाणीव करून देत समज देण्यात आली. यापूर्वीही इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तानच्या १० खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.