डब्लिन: न्यूझीलंड महिला क्रिकेट संघानं आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तब्बल 490 धावा कुटल्या आहेत. या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडच्या महिलांनी सर्वोच्च धावसंख्येचा स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. 2016 मध्ये न्यूझीलंडच्या संघानं पाकिस्तानविरुद्ध 3 बाद 444 धावा कुटल्या होत्या. यानंतर आज न्यूझीलंडच्या महिलांनी आयर्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत 4 बाद 490 धावांचा डोंहर उभारला. आयर्लंडच्या डब्लिनमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्सनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुझीनं कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. तिनं चौफेर फटकेबाजी करत 94 चेंडूंमध्ये 151 धावांची खेळी साकारली. या खेळीत सुझीनं 24 चौकार आणि 2 षटकार लगावले. सुझीसह सलामीला आलेल्या जेस वॅटकिननं 62 धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 172 धावांची भागिदारी केली. जेस वॅटकिनला लेविसनं बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मॅडी ग्रीननं 77 चेंडूंमध्ये 121 धावांची खेळी साकारत संघाची धावगती वाढवली. ग्रीननं 15 चौकार आणि एका षटकाराची बरसात केली. सुझी बेट्स आणि मॅडी ग्रीन बाद झाल्यावर अमेलिया केरनं आयर्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. केरनं 45 चेंडूंमध्ये 81 धावा चोपून काढल्या. केरनं 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. सुझी बेट्स, मॅडी ग्रीन आणि अमेलिया केरच्या घणाघाती फलंदाजीमुळे न्यूझीलंडला एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- तुफान आलंया! न्यूझीलंडच्या महिलांची विक्रम कामगिरी; 50 षटकात कुटल्या 490 धावा
तुफान आलंया! न्यूझीलंडच्या महिलांची विक्रम कामगिरी; 50 षटकात कुटल्या 490 धावा
आयर्लंडच्या संघाविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 8:30 PM