बर्मिंगहॅम : न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार अॅमी सॅटर्थवेटनं ती गर्भवती असल्याची घोषणा मंगळवारी केली. जानेवारी 2020मध्ये आपल्या घरी लहान पाहुणा येणार असल्याचे तिनं सोशल मीडियावर जाहीर केले. त्यानंतर अभिनंदनाचा वर्षाव पडला. विशेष म्हणजे मार्च 2017मध्ये अॅमीने संघातील सहकारी ली ताहूहूशी विवाह केला. 2014मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. आता गर्भवती असल्यामुळे अॅमीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यानंतर 2021मध्ये होणाऱ्या महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून ती संघात पुनरागमन करणार आहे. पण, तिला 2020मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
महिला क्रिकेटमधील पहिले जोडपे असलेल्या न्यूझीलंडच्या अॅमी आणि ताहूहू यांनी 2014 मध्ये विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतल्यावर प्रत्यक्षात मार्च 2017 मध्ये लग्न केले. त्यांच्यात चार वर्षांनी लहान असलेल्या जलद गोलंदाज ली हिने अॅमीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. या जोडप्यातील सॅथर्थवेट ही 2017 ची आयसीसी 'प्लेयर ऑफ दी इयर'सुद्धा होती. 2016-17 च्या मोसमात तिने वन डे सामन्यांमध्ये लागोपाठ चार शतके करण्याचा विक्रम केला आहे तर ली ताहूहू ही महिला क्रिकेटमधील सर्वात जलद गोलंदाजांमध्ये गणली जाते.