न्यूझीलंडच्या क्रिकेट संघानं नुकतंच पाकिस्तान दौऱ्यातून सुरक्षेच्या कारणास्तव ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यूझीलंडच्या महिला संघाला बॉम्बची धमकी दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला न्यूझीलंडच्या महिला संघासंदर्भात एक धमकीचा ई-मेल मिळाला आहे. न्यूझीलंडचा महिला संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. उभय देशांमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळवली जात आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाला धमकीचा ई-मेल मिळाला आहे. यात लीसेस्टर येथे बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. न्यूझीलंडचा महिला क्रिकेट संघ सध्या लीसेस्टरमध्येच आहे. खबरदारी म्हणून संघाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पण सराव रद्द करण्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं दिली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाला मिळालेल्या ई-मेलमध्ये न्यूझीलंडचा महिला क्रिकेट संघ सध्या ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. त्याच हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर न्यूझीलंडचा संघ ज्या विमानानं मायदेशी जाईल त्या विमानात देखील बॉम्ब ठेवण्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली आहे.