Join us  

NZ vs SL : श्रीलंकेवर तब्बल 44 वर्षांनी ओढावली नामुष्की; वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेशाचा मार्ग बंद

sri lanka vs new zealand : सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेची डोकेदुखी आणखी वाढली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 1:17 PM

Open in App

Sri Lanka failed to Qualify directly into the 2023 World Cup । नवी दिल्ली : सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (NZ vs SL) असलेल्या श्रीलंकेची डोकेदुखी वाढली आहे. 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतील 2 सामने जिंकून यजमान न्यूझीलंडने आशियाई किंग्ज श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला आहे. खरं तर या पराभवामुळे श्रीलंकेचा वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेशाचा मार्ग बंद पूर्णपणे बंद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेचा मोठा पराभव झाला होता. याशिवाय श्रीलंकेचा संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्याप्रकरणी आयसीसीने श्रीलंकेच्या खात्यातील एक गुण वजा करून लंकेला आणखी एक धक्का दिला होता. 

दरम्यान, 28 मार्च रोजी होणारा मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. अशा स्थितीत विश्वचषकात थेट पात्र होण्यासाठी श्रीलंकेला शेवटचा वन डे सामना जिंकणे अत्यंत गरजेचे होते. मात्र आज झालेल्या अखेरच्या सामन्यात किवी संघाने 6 गडी राखून विजय मिळवत मालिका खिशात घातली. या पराभवासह श्रीलंकेचे विश्वचषकात थेट प्रवेश मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे तब्बल 44 वर्षांनंतर श्रीलंकेचा संघ विश्वचषकात थेट प्रवेश मिळवण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता श्रीलंकेचा संध जूनमध्ये पात्रता फेरीचे सामने खेळेल. याआधी श्रीलंकेने विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील पहिला सामना 1979 मध्ये खेळला होता. 

न्यूझीलंडचा 'मालिका'विजयमालिकेतील अखेरच्या वन डे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने सावध खेळी केली मात्र किवी संघाने गोलंदाजीच्या आक्रमक माऱ्याच्या जोरावर लंकेला केवळ 157 धावांवर गुंडाळले. श्रीलंकेकडून पाथुम निसंकाने सर्वाधिक 57 धावा केल्या, तर कर्णधार दासुन शनाका (31) आणि चमिका करूणारत्ने (24) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही अपयश आले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत 41.3 षटकांत श्रीलंकेला 157 धावांवर सर्वबाद केले. किवी संघाकडून मॅट हेनरी, हेनरी शिप्ले आणि डेरी मिचेल यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. 158 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून विल यंगने 113 चेंडूत नाबाद 86 धावांची खेळी केली, तर हेनरी निकोलसने नाबाद 44 धावा करून किवी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :श्रीलंकान्यूझीलंडआयसीसी आंतरखंडीय चषकआयसीसी
Open in App