अखेर यजमानांनी मिळवला विजय; पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताचा ४ गड्यांनी पराभव

रॉस टेलरचे दमदार शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 02:30 AM2020-02-06T02:30:34+5:302020-02-06T06:20:29+5:30

whatsapp join usJoin us
New zealand won; India lost by 4 wickets in the first ODI | अखेर यजमानांनी मिळवला विजय; पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताचा ४ गड्यांनी पराभव

अखेर यजमानांनी मिळवला विजय; पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताचा ४ गड्यांनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हॅमिल्टन : टी२० मालिकेतील अपयशी कामगिरी मागे ठेवताना यजमान न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे कडवे आव्हान ४ गड्यांनी परतावले. या शानदार विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत ४ बाद ३४७ धावांचा एव्हरेस्ट उभारल्यानंतर यजमानांनी शांतपणे खेळ करताना ४८.१ षटकांतच ६ बाद ३४८ धावा करुन बाजी मारली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर नाबाद १०९ धावा करुन सामनावीर ठरला.

टी२० मालिकेत ०-५ असा एकतर्फी पराभव पत्करलेला असल्याने सेडन पार्क येथे झालेल्या या सामन्यात यजमान संघ सुरुवातीला दडपणाखालीच होता. त्यात नाणेफेक जिंकूनही भारतीय फलंदाजांनी धुलाई केल्याने त्यांच्या दडपणामध्ये आणखी भर पडली. मात्र टेलर आणि कर्णधार टॉम लॅथम यांनी थंड डोक्याने खेळ करताना कोणतेही दडपण न घेता चौथ्या गड्यासाठी १३८ धावांची निर्णायक भागीदारी केली. यामुळेच न्यूझीलंडला पुनरागमन करता आले. टेलरने अखेरपर्यंत नाबाद राहताना ८४ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह १०९ धावा केल्या, तर लॅथमने किवी संघाला हाताबाहेर गेलेली आवश्यक धावगती पुन्हा मिळवून देताना ४८ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६९ धावांचा तडाखा दिला.

या दोघांमुळे भारताच्या श्रेयस अय्यरचे शतक व लोकेश राहुलचे दमदार अर्धशतक झाकोळले गेले. विशेष म्हणजे या सामन्यात भारत व न्यूझीलंडच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजांनी शतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात एकाच सामन्यात दोन्ही संघांच्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही केवळ तिसरी घटना घडली. भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल (३२) आणि हेन्री निकोल्स (७८) यांनी ८५ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

गुप्टिल बाद झाल्यानंतर निकोल्सने ८२ चेंडूंत ११ चौकार मारले. २८व्या षटकापर्यंत भारताने सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र नंतर लॅथम-टेलर यांनी निर्णायक भागीदारी करत न्यूझीलंडच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. भारताकडून जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला नियंत्रित मारा करता आला नाही. कुलदीप यादवने २ बळी घेतले खरे, मात्र यासाठी त्याने १० षटकांत तब्बल ८४ धावा मोजल्या.

तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाºया पृथ्वी शॉ (२०) व मयांक अगरवाल (३२) या दोन्ही सलामीवीरांनी भारताला अर्धशतकी सलामी दिली. मात्र यानंतर लगेच दोघेही बाद झाले. कर्णधार विराट कोहलीने ६३ चेंडूंत ६ चौकारांसह ५१ धावा करुन श्रेयससह तिसºया गड्यासाठी १०२ धावांची भागीदारी केली. यानंतर अय्यर-राहुल यांनी भारताला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. श्रेयसने १०७ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह १०३, तर राहुलने ६४ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ८८ धावांचा तडाखा दिला. केदार जाधवनेही १५ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या.

टर्निंग पॉइंट

३४ ते ४१ या आठ षटकांच्या खेळामध्ये लॅथम-टेलर यांनी जबरदस्त हल्ला करताना १३.८८ च्या तुफानी सरासरीने तब्बल १११ धावा कुटल्या. या आठ षटकांमध्ये सामना भारताच्या हातून निसटला. यादरम्यान लॅथमने २४ चेंडूंत ५३, तर टेलरने २५ चेंडूंत ४८ धावा कुटल्या.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ४ बाद ३४७ धावा (श्रेयस अय्यर १०३, लोकेश राहुल नाबाद ८८, विराट कोहली ५१; टिम साऊदी २/८५.) पराभूत वि.

न्यूझीलंड : ४८.१ षटकांत ६ बाद ३४८ धावा (रॉस टेलर नाबाद १०९, हेन्री निकोल्स ७८, टॉम लॅथम ६९; कुलदीप यादव २/८४.)

महत्त्वाचे :

कुलदीप यादव ८४ धावांची खैरात एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसºया क्रमांकाचा महागडा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्याआधी पियूष चावला (८५) आणि युझवेंद्र चहल (८८) यांचा क्रमांक आहे.

दोन्ही संघांच्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांनी एकाच सामन्यात शतक ठोकण्याची केवळ तिसरी वेळ. याआधी २०१७ साली युवराज सिंग (१५०) - इयॉन मॉर्गर्न (१०२, इंग्लंड) आणि २००७ साली एबी डिव्हिलियर्स (१०७, द. आफ्रिका)-तातेंदा तैबू (१०७, झिम्बाब्वे) यांनी अशी कामगिरी केली आहे.

भारताविरुद्ध दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम न्यूझीलंडने केला. २०१९ साली ऑस्ट्रेलियाने भारताच्या ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

संथ षटकगतीचा भारताला फटका

हॅमिल्टन: भारतीय क्रिकेट संघाला बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान संथ गतीने षटके टाकल्यामुळे दंड करण्यात आला. सामन्याच्या फीच्या ८० टक्के दंड भारतीय संघाला करण्यात आला आहे. हा सामना गमवल्याने भारत तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत ०-१ने पिछाडीवर पडला आहे. आयसीसीच्या एलिट पॅनेलचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हा दंड ठोठावला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालीलं संघाने निर्धारित वेळेत चार षटके संथ गतीने टाकल्याचे आढळले. हा आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग मानला गेला. जर संघाने निर्धारित वेळेत षटके टाकली नाही तर संघावर प्रतिषटकामागे २० टक्के दंड आकारण्यातयेतो. आयसीसीच्या मतानुसार विराट कोहलीने दंड मान्य केल्यामुळे पुढील सुनावणी करण्यात आली नाही.

Web Title: New zealand won; India lost by 4 wickets in the first ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.